
पनवेल, दि.२७ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दररोज ७० ते ७२ दशलक्ष लिटर पाण्याची तूट जाणवत असताना नवीन बांधकामांना परवानग्या देणे थांबवावे, अशी मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख व नगरसेवक अॅड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी केली आहे. त्यांनी २७ नोव्हेंबर रोजी शिष्टमंडळासह महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
महापालिका क्षेत्रात सध्या आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून कपात केली जात आहे. अशा परिस्थितीत सुरू असलेल्या बांधकामांमुळे पिण्याच्या पाण्यावर अतिरिक्त ताण येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. एका बांधकाम प्रकल्पासाठी दररोज सुमारे १० हजार लिटर पाणी लागते. महापालिका क्षेत्रातील २०० प्रकल्पांचा विचार केल्यास दररोज सुमारे दोन दशलक्ष लिटर पाणी बांधकामांसाठी खर्च होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
न्हावा-शेवा टप्पा क्रमांक तीन पाणीपुरवठा योजना सुरू होऊन अतिरिक्त पाणी उपलब्ध होईपर्यंत नवीन बांधकाम परवानग्यांना स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सुरू असलेल्या बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर बंद करून पुनर्प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक करावे, अशीही सूचना केली आहे.
मीरा-भाईंदर, ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी पाणीटंचाईच्या काळात बांधकामांबाबत निर्बंध लागू केल्याचा दाखला निवेदनात देण्यात आला आहे. पनवेलकरांना नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी अॅड. सोमण यांनी केली आहे.
यावेळी युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, उपमहानगरप्रमुख सचिन मोरे, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे, खंडेश धनावडे आणि मंदार काणे यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री भरतशेठ गोगावले, खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनाही पाठविण्यात आली आहे.



Be First to Comment