




प्रतिनिधी, आवरे (सचिन पाटील)
आजी-आजोबा म्हणजे कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ. त्यांच्या अनुभवातून, प्रेमातून आणि मार्गदर्शनातून नातवंडांवर संस्कारांचे बीजारोपण होत असते. आजी-आजोबांप्रती कृतज्ञता, प्रेम, आदर आणि आपुलकी व्यक्त करण्याच्या उद्देशाने जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल, आवरे येथे आजी-आजोबा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये आजी-आजोबांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. पूर्वीच्या काळात आजी-आजोबा नातवंडांना गोष्टी, कथा आणि जीवनातील अनुभव सांगून त्यांच्यावर संस्कार करत असत. या अनुभवातून मिळणारी शिकवण विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात मोलाची ठरते. याच भावनेतून शाळेत आजी-आजोबा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेच्या प्रवेशद्वारावर आजी-आजोबांची लागलेली रांग. दररोज विद्यार्थ्यांची रांग दिसणाऱ्या प्रवेशद्वारावर या दिवशी आजी-आजोबांची उपस्थिती पाहायला मिळाली. प्रत्येक विद्यार्थ्यासोबत त्यांचे आजी किंवा आजोबा विद्यालयात उपस्थित होते. ‘अतिथी देवो भव’ या भारतीय संस्कृतीतील परंपरेनुसार प्रवेशद्वारावर लेझीम पथकाच्या तालात आणि शिक्षकवृंदाच्या औक्षणाने आजी-आजोबांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी विद्यार्थी विविध आकर्षक वेशभूषा करून आले होते. कोणी सैनिक, कोणी डॉक्टर, वकील, मॅनेजर, तर कोणी पारंपरिक वेशभूषेत सजले होते. विद्यार्थ्यांच्या कल्पक आणि उत्साहपूर्ण वेशभूषेमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
आजी-आजोबांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगीत खुर्ची हा खेळ विशेष आकर्षण ठरला. आजी-आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित आजी-आजोबांच्या हस्ते दीपप्रज्वलन, श्री गणेशपूजन, सरस्वती माता पूजन तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. निकिता म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
आजी-आजोबा आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल, आवरे येथे आजी-आजोबा दिवस आनंददायी वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आजी-आजोबांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना जपण्याचा सुंदर संदेश मिळाला



Be First to Comment