
जळगाव(आनंद पवार)भारतीय लोकशाहीचा भक्कम पाया असलेल्या संविधानाचा गौरव, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि संविधानिक हक्क व कर्तव्यांची जाणीव जागृत करण्याच्या उद्देशाने शिरसोदे-बहाद्दरपूर (ता.पारोळा,जि.जळगाव)येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी आयोजित या कार्यक्रमात ग्रामस्थांनी एकत्र येत संविधानाप्रती आदर आणि निष्ठा व्यक्त केली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या भारतीय संविधानाचा स्वीकार संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी केला.या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समानता,स्वातंत्र्य,न्याय आणि बंधुतेची मूल्ये प्रदान केली असून,लोकशाही व्यवस्थेला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.शिरसोदे ग्रामपंचायतीच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर माजी प्राचार्य अमृत चिंधा पवार,जेष्ठ बौद्धाचार्य भानुदास दुला पवार, सेवानिवृत्त पोलीस हवालदार विक्रम पवार आणि सेवानिवृत्त पोलीस पाटील एकनाथ दुला पवार यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी दीप आणि धूप प्रज्वलित करून परिसर प्रकाशमय व सुगंधमय केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सर्वांनी आदरपूर्वक अभिवादन केले.संविधान दिनाच्या निमित्ताने परिसरात उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमात ग्रामपंचायत लिपिक चंद्रशेखर महाजन, राजेंद्र नथ्थू पाटील,प्रल्हाद दगडु पाटील,सुरेश चिंधा पवार,मुकेश पवार,अशोक पवार,संजय पवार,जितेंद्र पवार,कैलास अशोक पवार राजेंद्र मन्साराम पवार,गोवधऀन प्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते.यानंतर पत्रकार आनंद पवार यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.उपस्थित ग्रामस्थांनी संविधानातील मूल्यांचे पालन करण्याची, लोकशाही बळकट करण्याची आणि सामाजिक समता, बंधुता व न्यायाची भावना समाजात रुजविण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली.
संविधानाचा सन्मान,
लोकशाहीचा अभिमान
संविधान दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून प्रत्येक नागरिकाला आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक विचारांचा अंगीकार करून समाजात समता, एकता आणि बंधुतेचे वातावरण निर्माण करणे हीच त्यांना खरी अभिवादनाची भावना असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.शिरसोदे-बहाद्दरपूर येथे संविधान दिन उत्साहात साजरा करत ग्रामस्थांनी भारतीय संविधानाप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाने संविधानिक मूल्यांचा संदेश गावागावांत पोहोचविण्याचा प्रेरणादायी उपक्रम साध्य केला.



Be First to Comment