Press "Enter" to skip to content

आधी झाडे लावा, मग विकास करा !मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि एमएमआरडीएला चपराक

वृक्षतोडीच्या परवानगीपूर्वी २० ते ३० टक्के आगाऊ वृक्षारोपण करण्याचे निर्देश; वृक्षारोपणाच्या जगण्याच्या प्रमाणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबई, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६
मुंबई प्रतिनिधी : सतीश पाटील

मुंबई : विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड आणि पर्यावरणाची हानी यावर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) चांगलेच धारेवर धरले आहे. विकास प्रकल्पांसाठी वृक्षतोड तसेच खारफुटीची जमीन वळती करण्याची परवानगी मागण्यापूर्वी आगाऊ वृक्षारोपण करून पर्यावरणीय समतोल राखल्याचे ठोस पुरावे सादर करा, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. “आधी झाडे लावा, मग विकास करा” असा ठाम संदेश न्यायालयाच्या निरीक्षणातून समोर आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (२५ नोव्हेंबर) बीकेसी येथील एलिव्हेटेड पॉड कार कॉरिडॉर प्रकल्पाच्या सुनावणीदरम्यान ही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवण्यात आली.

परवानगीपूर्वी २० ते ३० टक्के वृक्षारोपण करा

विकास प्रकल्पांसाठी वृक्षतोडीची परवानगी मागण्यापूर्वीच किमान २० ते ३० टक्के वृक्षारोपण पूर्ण केलेले असावे. केवळ कागदोपत्री वृक्षारोपण दाखवून पर्यावरणीय नुकसान भरून निघत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

झाडांची वाढ होण्यासाठी पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे वृक्षतोडीची परवानगी मिळाल्यानंतर वृक्षारोपण सुरू करून पर्यावरणाची तातडीने होणारी हानी रोखता येणार नाही, असेही खंडपीठाने नमूद केले.

जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न नको

वृक्षारोपणाची जबाबदारी वन विभागाची असून आम्ही केवळ बांधकामाचे तज्ज्ञ आहोत, अशी भूमिका सरकारी यंत्रणांनी घेऊ नये, असे न्यायालयाने सुनावले. विकास प्रकल्प राबवणाऱ्या यंत्रणांनी पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीही तितक्याच गांभीर्याने पार पाडली पाहिजे, असा स्पष्ट संदेश या सुनावणीतून देण्यात आला.

पाच वर्षांचा वृक्षतोडीचा लेखाजोखा मागवला

राज्यात गेल्या चार ते पाच वर्षांत किती वृक्षतोड झाली, किती वृक्षारोपण करण्यात आले आणि लावलेल्या रोपट्यांपैकी किती रोपे प्रत्यक्षात जगली, याचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकार आणि एमएमआरडीएला दिले आहेत.

वृक्षारोपणाच्या केवळ संख्येवर नव्हे, तर लावलेल्या झाडांच्या जगण्याच्या प्रमाणावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांच्या वृक्षारोपण मोहिमांचा प्रत्यक्ष परिणाम स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

बीकेसी पॉड कार प्रकल्पाच्या परवानगीवर सुनावणी

बीकेसीमध्ये ८.८५ किलोमीटर लांबीच्या एलिव्हेटेड पॉड कार अर्थात एआरटीएस प्रकल्पासाठी ०.२८६९ हेक्टर खारफुटीची वनजमीन वळती करण्याची परवानगी एमएमआरडीएने मागितली आहे. या प्रकल्पामुळे सहा झाडे बाधित होणार असून, त्याऐवजी १०० झाडे लावण्याची हमी प्राधिकरणाने दिली होती.

मात्र, केवळ झाडे लावण्याची हमी पुरेशी नसून त्याबाबत ठोस पुरावे आणि पर्यावरणीय संरक्षणाच्या उपाययोजनांचा तपशील आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

विकास हा पर्यावरणाच्या किंमतीवर होऊ नये, तर निसर्गाचे संवर्धन करूनच विकासाची वाटचाल व्हावी, हा मुंबई उच्च न्यायालयाच्या निरीक्षणांचा महत्त्वपूर्ण संदेश आहे

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.