
रोहा : समीर बामुगडे
रोहा वनविभागाने धाटाव MIDC परिसरात व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) तस्करीविरोधात केलेली कारवाई खरोखरच कौतुकास्पद आणि धाडसी आहे. खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने अत्यंत सतर्कतेने आणि वेगवान हालचाल करून हा प्रकार उघडकीस आणला. या धडक मोहिमेत अंदाजे एक किलो वजनाचा मौल्यवान मुद्देमाल, दोन दुचाकी वाहने आणि चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून अमन अनंत जाधव आणि समीर हरिश्चंद्र सातपुते या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वन्यजीव तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांना वेळीच रोखणे हे निसर्ग आणि जैवविविधतेच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
या संपूर्ण मोहिमेचे यश उपवनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक श्री. आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. महेंद्र दबडे, वनपाल श्री. पी. व्हि. शिंदे, वनपाल श्री. गोरक्षनाथ दहिफळे आणि सर्व वनरक्षक कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. कमी संसाधनांमध्ये आणि अनेक आव्हानांचा सामना करत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र जंगले, वनसंपदा आणि वन्यप्राण्यांचे रक्षण करत असतात. या कारवाईतून त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की अवैध धंदे आणि वन्यजीव तस्करी करणाऱ्यांविरोधात प्रशासन पूर्णपणे सज्ज आणि कठोर आहे.
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू ठेवणे ही कायद्याची कडक अंमलबजावणी दर्शवते. अशा धाडसी कारवायांमुळे समाजामध्ये कायद्याचा धाक निर्माण होतो आणि वन्यजीवांच्या तस्करीत गुंतलेल्या घटकांना स्पष्ट इशारा मिळतो. त्याचबरोबर नागरिकांनीही अवैध वृक्षतोड, शिकार, वणवा किंवा वनजमिनीवरील अतिक्रमणाबाबत वनविभागाच्या ‘हॅलो फॉरेस्ट’ १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर माहिती देऊन वनविभागाला साथ द्यायला हवी. निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी झटणाऱ्या रोहा वनविभागाच्या संपूर्ण पथकाचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक!


Be First to Comment