


पनवेल (प्रतिनिधी) राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या १३ व्या पर्वातील पुणे केंद्राची प्राथमिक फेरी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या फेरीत रसाभिनय, अहिल्यानगर या संस्थेच्या ‘लाजाळू’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. क्रिदम थिएटरच्या ‘लेबल’ या एकांकिकेने द्वितीय, तर अण्णासाहेब मगर विद्यालयाच्या ‘आठवडे बाजार’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळविला. या तिन्ही एकांकिकांची स्पर्धेच्या पुढील महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
पुणे येथील मुक्त थिएटर धायरी येथे झालेल्या या प्राथमिक फेरीचे उदघाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी परीक्षक दिपक पवार, परीक्षक विशाल कदम, टीम अटल करंडक चे अमोल खेर, अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, चिन्मय समेळ, वैभव बुवा, दिव्या शेठ, कोमल पाटील, निखिल गोरे, स्वप्निल खांबायत, संकेत मोडक, गोविंद राजपुरोहित आदि उपस्थित होतेनवोदित रंगकर्मींच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या अटल करंडक स्पर्धेला यंदा राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्रातील १०० हून अधिक एकांकिका संघांनी सहभाग नोंदविलेल्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे येथे प्राथमिक फेरी पार पडली. यामध्ये सहभागी संघांनी विविध विषयांवरील आशयपूर्ण आणि दर्जेदार एकांकिकांचे सादरीकरण करीत परीक्षकांसह उपस्थित रसिकांची दाद मिळवली.भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा गेल्या बारा वर्षांपासून नवोदित कलाकारांना आपली अभिनयक्षमता, कल्पकता आणि नाट्यकौशल्य सादर करण्याची संधी देत आहे. ‘रंगमंच आमचा, कलाविष्कार तुमचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मराठी रंगभूमीला नवे कलाकार मिळत आहेत.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त), नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखेचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने आणि स्पर्धाप्रमुख, माजी सभागृह नेते तथा नगरसेवक परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.पुणे केंद्रातील प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या तिन्ही एकांकिका आता महाअंतिम फेरीत आपला कलाविष्कार सादर करणार आहेत. अटल करंडकची महाअंतिम फेरी १८, १९ आणि २० डिसेंबर २०२६ रोजी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे रंगणार असून, प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला एक लाख रुपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ देण्यात येणार आहे.


Be First to Comment