
खोपोली : प्रतिनिधी
वीटभट्टीवर कष्ट करणाऱ्या आई-वडिलांच्या संघर्षमय आयुष्यातून घडलेल्या बाबू पुजारी यांनी आपल्या संवेदनशील लेखणीतून दुष्काळग्रस्त बळीराजाच्या वेदनांना आवाज दिला आहे. ‘बा विठ्ठला, आता तरी बोल’ या आर्त भावनेतून साकारलेल्या त्यांच्या गीताचा लोकार्पण सोहळा भागवत एकादशीच्या पावन पर्वावर खोपोलीतील ब्राह्मण सभा सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
ह.भ.प. रामदास महाराज पाटील आणि खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी उपनगराध्यक्ष मोहन औसरमल, नगरसेविका एडवोकेट अनिता पवार, उज्वला महाडिक, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश राजोपाध्ये यांच्या उपस्थितीत गीताचे लोकार्पण आणि सादरीकरणही करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यप्रेमी आणि बाबू पुजारी यांचे मित्रपरिवार उपस्थित होते.
वीटभट्टीवरील कष्टातून बालपण अनुभवलेल्या बाबू पुजारी यांच्यासाठी वीट आणि विठ्ठल यांचे नाते केवळ योगायोग नसून त्यांच्या जीवनप्रवासाशी जोडलेली भावनिक अनुभूती आहे. याच भावविश्वातून साकारलेल्या गीतात दुष्काळाने त्रस्त झालेला शेतकरी, करपणारी पिके, आटलेल्या विहिरी आणि हतबल झालेल्या बळीराजाची व्यथा विठुरायापुढे मांडण्यात आली आहे. या गीताच्या माध्यमातून बाबू पुजारी यांनी भक्ती आणि सामाजिक संवेदनशीलतेचा सुरेख संगम साधला आहे. केवळ भगवंताकडे कृपेची याचना न करता, आपल्या जगण्याशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदनांचा जाब जिव्हाळ्याने विचारणारा भक्त आणि विठ्ठल यांच्यातील भावसंवाद या गीतातून व्यक्त होतो.
यावेळी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी बाबू पुजारी यांच्या साहित्यिक आणि सामाजिक जाणिवांचे कौतुक करत हे गीत महाराष्ट्रभर पोहोचावे, अशा शुभेच्छा दिल्या. तर ह.भ.प. रामदास महाराज पाटील यांनी गीताच्या शीर्षकातील आर्तता आणि त्यामागील भावनेचे विशेष कौतुक केले. या एका शीर्षकावरही दोन तास कीर्तन करता येईल, अशी भावना व्यक्त करत बाबूंनी विठ्ठलाच्या चरणी गीतरूपी पुष्प अर्पण केल्याचे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ साठेलकर यांनी केले. युवा कवी विशाल उशिरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गीतनिर्मितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.



Be First to Comment