Press "Enter" to skip to content

पनवेलच्या पाणीप्रश्नावर पालकमंत्र्यांची विशेष बैठक;पाणीप्रश्नी आमदार विक्रांत पाटील आक्रमक !

न्हावाशेवा टप्पा क्रमांक तीनचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी; एमआयडीसीकडून वाढीव १० एमएलडी पाणी द्यावे आणि छोटे मोरबे धरणावरील खाजगी बिल्डरचे आरक्षण उठवावे ; आमदार विक्रांत पाटील यांची मागणी

पनवेल /प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या दालनात सोमवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेलच्या पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका मांडत विविध उपाययोजना सुचवल्या. रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यासह पर्यायी जलस्रोत उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली.

या बैठकीला पनवेल महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) एमआयडीसी आणि सिडकोचे अधिकारी उपस्थित होते. पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध प्रभाग तसेच सिडकोने विकसित केलेल्या वसाहतींना आवश्यक असणारा पाणीपुरवठा, प्रत्यक्ष उपलब्ध पाणी आणि मागणीतील तूट याचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले. ही तूट भरून काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर चर्चा झाली. यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी न्हावाशेवा टप्पा क्रमांक तीनच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा उपस्थित केला.

या योजनेचे काम कशामुळे रखडले आहे आणि पनवेलच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने हा टप्पा किती महत्त्वाचा आहे, याची माहिती त्यांनी दिली. हा टप्पा तातडीने कार्यान्वित करण्यासाठी एमजेपीला आवश्यक आदेश देण्याची मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पनवेलच्या पाणीप्रश्नी स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची मागणीही केली. जीर्ण झालेल्या पाइपलाइन आणि प्रलंबित कामांचे त्यांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण केले. पनवेल तालुक्यातील मोरबे धरणातील खासगी विकासकला दिलेले पाण्याचे आरक्षण रद्द करून त्यातील पाणी पनवेलसाठी उपलब्ध करून दिल्यास शहराला सुमारे १० एमएलडी पाणी मिळू शकते, अशी सूचना त्यांनी मांडली.

याशिवाय एमआयडीसीकडून आणखी १० एमएलडी वाढीव पाणी मिळावे, अशी मागणीही केली. दरम्यान, एमजेपीच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पाइपलाइनसंदर्भातील उर्वरित कामे तीन महिन्यात पूर्ण करण्याची तंबी आमदार विक्रांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली.

या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, महापौर नितीन पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, नगरसेवक रामदास शेवाळे,अरविंद म्हात्रे,ॲड. प्रथमेश सोमण, कळंबोली शिवसेना शहराध्यक्ष तुकाराम सरक यांच्यासह जलसंपदा विभाग, सिडको, एमजेपी आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पनवेलकरांची तहान भागविण्यासाठी विविध जलस्रोत आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.