Press "Enter" to skip to content

महिलांच्या कलागुणांवर टीका न करता त्यांना प्रोत्साहन द्या : सभापती ममता म्हात्रे

करंजाडे महोत्सवात फॅशन शोचा उत्साह : सारिका पवार ठरल्या ‘मिसेस करंजाडे २०२६’च्या मानकरी

पनवेल/प्रतिनिधी :– पनवेल पश्चिम मंडळ भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आणि ‘करंजाडे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास मंडळा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘करंजाडे महोत्सवा’त आज ‘फॅशन शो’चा रंगारंग कार्यक्रम उत्साहात पार पडला. या स्पर्धेत १२ महिलांनी सहभाग घेतला असून, त्यातून सारिका पवार यांनी ‘मिसेस करंजाडे २०२६’ हा मानाचा किताब पटकावला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती ममता प्रितम म्हात्रे यांनी महिलांवर टीका न करता त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, महिला व बालकल्याण सभापती ममता प्रितम म्हात्रे, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वासकर, वडघर पंचायत समिती सदस्या मनीषा पाटील, कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वासकर, दापोलीचे माजी सरपंच गजानन पाटील, मनखुष नाईक युवा नेते भाजप, सामाजिक कार्यकर्त्या रुपाली कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनोगत व्यक्त करताना सभापती ममता म्हात्रे म्हणाल्या की, “स्त्री आणि पुरुष एकमेकांना आधार देतात, तेव्हाच कोणतेही कार्य यशस्वीपणे पूर्ण होते. अनेक वर्षे दडपून राहिलेल्या महिला आज धैर्याने पुढे येत आहेत. समाजाने त्यांच्यावर अनावश्यक टीका न करता त्यांच्या कलागुणांचे मनापासून कौतुक करायला हवे.” महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.
यानंतर बोलताना माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी स्थानिक महिला लोकप्रतिनिधींच्या कार्याचा गौरव केला. “महिला आज ५० टक्क्यांवरून ५१ टक्क्यांकडे वाटचाल करत आहेत. राजकारणात नवख्या असूनही सभापती रंजना वासकर, सदस्या मनीषा पाटील आणि ममता म्हात्रे या महिला पदाधिकारी अनेक अडचणींवर मात करत विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे घरोघरी पोहोचत आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच, करंजाडेकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचेही त्यांनी विशेष आभार मानले. या फॅशन शोमध्ये १२ महिला स्पर्धकांनी आत्मविश्वासाने सहभाग नोंदवत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेतील विजेत्या सारिका पवार यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रितम म्हात्रे आणि ममता म्हात्रे यांचा रॅम्प वॉक ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू..

या कार्यक्रमादरम्यान पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी, महिला व बालकल्याण सभापती ममता प्रितम म्हात्रे यांनी स्वतः फॅशन शोमध्ये सहभागी होत रॅम्प वॉक केला. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी या दाम्पत्याने रॅम्पवर पाऊल ठेवताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे जोरदार स्वागत केले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.