Press "Enter" to skip to content

मोफत दिलेल्या सॅनिटरी पॅड मशीन धूळखात; आता नव्या खरेदीचा घाट कशासाठी ?


नऊ शाळांतील पाहणीत एकही मशीन सुरू नसल्याचा शिवसेना नगरसेवक प्रथमेश सोमण यांचा दावा; महासभेत प्रशासनाच्या देखभालीवर प्रश्नांची सरबत्ती

पनवेल, दि.२२ (वार्ताहर) : शाळांमधील मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनची देखभाल करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचा मुद्दा पनवेल महापालिकेच्या महासभेत गाजला. आधी मोफत मिळालेल्या मशीन सुरू ठेवता आल्या नाहीत आणि आता नव्याने मशीन खरेदी करण्याचा ठराव कशासाठी, असा थेट सवाल नगरसेवक तथा महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी उपस्थित केला. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिवसेनेच्या वतीने प्रथमेश सोमण आणि सहकारी पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पनवेल महापालिकेला सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि १० हजार पॅड्स मोफत दिले होते. या उपक्रमाचे शिंदे यांनी कौतुकही केले होते. मात्र, या मशीनची देखभाल आणि दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप सोमण यांनी महासभेत केला.

शिवसेनेच्या महिला आघाडीने मंदा जंगले यांच्या नेतृत्वाखाली नऊ शाळांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी एकही मशीन सुरू नसल्याचे आढळल्याचा दावा करण्यात आला. काही शाळांमधील मशीनवर लावलेले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेले स्टिकर्सही काढून टाकण्यात आल्याचे पाहणीत समोर आल्याचे सांगण्यात आले.

मोफत मिळालेल्या मशीनचा साधा देखभाल खर्चही प्रशासनाला करता आला नाही, तर नव्याने खरेदी होणाऱ्या मशीनची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल सोमण यांनी उपस्थित केला. विद्यार्थिनींच्या सुविधांसाठी उपलब्ध करून दिलेल्या साधनांचा वापरच होत नसेल, तर नव्या खरेदीवर खर्च करण्यापूर्वी जुन्या मशीन बंद पडण्याची कारणे शोधून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी या मुद्द्यातून पुढे आली आहे. विद्यार्थिनींच्या आरोग्याशी संबंधित सुविधांबाबत प्रशासनाचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार का, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.