Press "Enter" to skip to content

प्रियांशीच्या टॅलेंटला सॅल्युट : महेंद्रशेठ घरत ; देशाचे नाव उज्ज्वल करणार : प्रियांशी पाटील

उलवे, ता. २१ : “आपल्याकडे क्रिकेट फिवर आहे. अशा वातावरणात अवघ्या १४ वर्षांची आपली लेक विंड सर्फिंगमध्ये देशाचे नेतृत्व करते, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. विंड सर्फिंग खेळाचे आपल्याकडे अनेकांना नावही माहीत नाही. मी जगभरात फिरत असल्याने प्रगत देशांमध्ये विंड सर्फिंगचे महत्त्व मला समजते. प्रगत देशांमध्ये खेळाडूंना सर्व सुविधा पुरविल्या जातात, मात्र आपल्या प्रियांशीला कोचही नव्हता. तिने मूलभूत सुविधा नसतानाही आई-वडिलांच्या खंबीर पाठिंब्याने विंड सर्फिंगमध्ये केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. युवा ऑलिम्पिकमध्ये २३ देशांच्या खेळाडूंत ती अतिशय कमी वयाची, तरीही तिने जिद्दीने प्रगत देशांच्या खेळाडूंमध्ये मुसंडी मारली. वारा आणि लाटांसोबत ती सहज खेळली. तिच्या एकूण कामगिरीबद्दल मी तिला सॅल्युट करतो. त्यामुळेच आज तिचा यथोचित सत्कार करण्याचे आम्ही ठरविले आणि आजचा योग आला,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत शेलघर येथे प्रियांशीच्या सत्काराप्रसंगी म्हणाले. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था आणि न्यू मॅरिटाईम जनरल कामगार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने प्रियांशी आणि तिच्या आई-वडिलांचा सत्कार शेलघर येथील जोमा नारायण घरत समाज मंदिरात शुक्रवारी (ता. २० )करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रियांशीची आई रुचिका म्हणाली, “प्रियांशी एकटी विविध देशांमध्ये जाऊन विंड सर्फिंगमध्ये पदके मिळवत आहे. आम्ही आमच्या परीने तिला साथ देतोय, परंतु आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तिला हव्या त्या सुविधा आणि दर्जेदार प्रशिक्षण आम्ही देऊ शकलो नाही. मात्र आम्ही जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा महेंद्रशेठ घरत साहेबांच्या ‘सुखकर्ता’ वर येतो, तिथून कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. तिला कोच नसतानाही आणि ती आजारी असतानाही तिने युवा ऑलिम्पिकमध्ये केलेली कामगिरी आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. तिने तिच्या जिद्दीने आमची आणि देशाचीही मान उंचावली आहे. अशा वेळी तिचा जाहीर सत्कार फक्त आणि फक्त महेंद्रशेठ घरत साहेब यांनी केला आहे. आम्ही हा क्षण आणि महेंद्रशेठ घरत साहेबांचे उपकार कधीच विसरू शकत नाही.”
यावेळी प्रियांशी म्हणाली, “मला आई-वडिलांचा खंबीर पाठिंबा आहे. महेंद्रशेठ घरत साहेबांची उत्तम साथ लाभली आहे. त्यामुळे येत्या काळात मी देशासाठी पदक मिळवणारच! मी हार मानणार नाही. लढतच राहणार आणि देशाचे नाव उज्ज्वल करीन.”
यावेळी लोखंडे सर, एम. जी. ग्रुपचे पदाधिकारी आणि प्रियांशी पाटीलचे कुटुंबीय उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.