
पनवेल, दि.२१ (वार्ताहर) : प्रभाग क्रमांक १४ मधील तहसीलदार कार्यालय मार्गावर दुचाकीस्वारांकडून होणाऱ्या भरधाव वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावर नागरिक, महिला आणि ज्येष्ठांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या ठिकाणी तातडीने रम्बल स्ट्रिप्स (वेग नियंत्रक पट्टे) बसवावेत, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रविण जाधव यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी दररोज नागरिकांची मोठी ये-जा सुरू असते. मात्र, याच मार्गावर काही दुचाकीस्वार वेगाने वाहने चालवत असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या मार्गावरून ये-जा करताना अपघाताचा धोका संभवतो. एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा वेळीच प्रतिबंधात्मक पावले उचलणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांनीही या मार्गावरील भरधाव वाहतुकीची समस्या निदर्शनास आणून देत वेगनियंत्रक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत आर्या जाधव यांनी महापालिका प्रशासनाकडे हा विषय मांडला आहे. आयुक्तांनी संबंधित वाहतूक व बांधकाम विभागाला तातडीने रम्बल स्ट्रिप्स बसविण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या जीविताचा प्रश्न लक्षात घेऊन महापालिका प्रशासन या मागणीवर कितपत तत्परतेने कार्यवाही करते, याकडे प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



Be First to Comment