Press "Enter" to skip to content

नगरसेवक दशरथ म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ! खांदा कॉलनीतील नाले व पावसाळी गटारांसाठी १२ कोटी ६४ लाख ४६ हजार रुपयांचा निधी मंजूरअनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडाडीच्या नगरसेवकाची ठोस कामगिरी; खांदा कॉलनीच्या विकासाला मिळणार नवी गती !


खांदा कॉलनी (प्रतिनिधी) : खांदा कॉलनीतील प्रलंबित नागरी समस्यांना आता विकासाची नवी दिशा मिळणार आहे. प्रभाग क्रमांक १५ मधील नाले, पावसाळी गटारे आणि संबंधित रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल १२ कोटी ६४ लाख ४६ हजार रुपयांचा निधी महानगरपालिकेच्या सभेत मंजूर करून घेण्यात नगरसेवक दशरथ बाळू म्हात्रे यांना मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि विकासकामांबाबतच्या आग्रही भूमिकेमुळे खांदा कॉलनीच्या विकासासाठी एवढ्या मोठ्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे.
विशेषतः प्रभाग क्रमांक १५ मधील प्लॉट क्रमांक १५, सेक्टर ८ येथील साईशरण सोसायटीसमोरील रस्ता ते प्लॉट क्रमांक १२ अ/ब, सेक्टर ६ येथील आगरी शिक्षण संस्था परिसरापर्यंतच्या नाल्याचे बांधकाम आणि रस्ता काँक्रीटीकरण यांसह विविध विकासकामांना या निधीतून गती मिळणार आहे.

खांदा कॉलनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यांची दुरवस्था, गटारांच्या फुटलेल्या संरचना, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या आणि अपूर्ण नागरी सुविधांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. मात्र, या प्रश्नांना प्राधान्य देत नगरसेवक दशरथ म्हात्रे यांनी प्रत्यक्ष परिसराची पाहणी, नागरिकांशी संवाद आणि महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यावर भर दिला. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामे मार्गी लावण्याची त्यांची कार्यपद्धती यामुळे आता चर्चेचा विषय ठरत आहे.

निवडून आल्यानंतर खांदा कॉलनीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा शब्द त्यांनी नागरिकांना दिला होता. तो शब्द पूर्ण करण्याच्या दिशेने त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विकासकामांसाठी आवश्यक निधी मंजूर करून घेणे ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून त्यासाठी अभ्यासपूर्ण भूमिका, सातत्य आणि ठाम इच्छाशक्ती आवश्यक असते. दशरथ म्हात्रे यांनी आपल्या कामातून हे सिद्ध केले आहे.

या विकासकामांसाठी पनवेलचे भाग्यविधाते लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे गटनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनातून विकासाचा संकल्प अधिक बळकट होत असल्याचे नगरसेवक दशरथ म्हात्रे यांनी सांगितले.
खांदा कॉलनीचा विकास हाच ध्यास! या भूमिकेतून काम करणाऱ्या दशरथ म्हात्रे यांनी निधी मंजुरीच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक वर्षांच्या अपेक्षांना सकारात्मक दिशा दिली आहे. आता मंजूर निधीतून ही कामे लवकरात लवकर प्रत्यक्षात उतरून खांदा कॉलनीतील नागरिकांना दर्जेदार रस्ते, सक्षम नाले आणि पावसाळी पाण्याचा योग्य निचरा होण्याची सुविधा मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पाठपुरावा, अभ्यास आणि विकासाची दूरदृष्टी यांचा संगम म्हणजे नगरसेवक दशरथ म्हात्रे यांची कार्यशैली, अशी भावना खांदा कॉलनीतील नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.