
महाराष्ट्रातील १०० हून अधिक एकांकिका संघांचा सहभाग; २१ नोव्हेंबरपासून प्राथमिक फेऱ्यांना प्रारंभ
पनवेल (प्रतिनिधी) : नवोदित रंगकर्मींच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ, त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा आणि मराठी रंगभूमीला उद्याचे सक्षम कलाकार देण्याच्या उद्देशाने सुरू झालेली राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धा यंदा आपल्या १३ व्या वर्षात दिमाखात पदार्पण करत आहे. महाराष्ट्रातील नाट्यविश्वात मानाचे स्थान निर्माण केलेल्या या स्पर्धेला यंदाही राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, १०० हून अधिक एकांकिका संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे यंदाही अटल करंडकच्या रंगमंचावर नवनवीन संकल्पना, दर्जेदार नाट्यप्रयोग आणि प्रतिभावान कलाकारांचा कलाविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. प्राथमिक फेरीला २१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर सुरुवात होणार आहे.
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांच्या नावाने सुरू झालेली ही स्पर्धा आज केवळ एकांकिका स्पर्धा न राहता महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांसाठी एक प्रतिष्ठेचे व्यासपीठ बनली आहे. ‘रंगमंच आमचा, कलाविष्कार तुमचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू असलेल्या या उपक्रमाने गेल्या बारा वर्षांत अनेक कलाकारांना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त), नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखेचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने आणि स्पर्धाप्रमुख, माजी सभागृह नेते (पनवेल महानगरपालिका) तथा नगरसेवक परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रभर रंगणार प्राथमिक फेरीचा नाट्यमहोत्सव!
यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागांतील नाट्यसंस्थांनी आणि महाविद्यालयीन संघांनी दाखवलेला उत्स्फूर्त सहभाग. अधिकाधिक कलाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभर विविध केंद्रांवर प्राथमिक फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राथमिक फेरीचे केंद्रनिहाय वेळापत्रक :
- पुणे – २१ व २२ नोव्हेंबर २०२६
- सातारा – २३ नोव्हेंबर २०२६
- कोल्हापूर – २४ नोव्हेंबर २०२६
- रत्नागिरी – २५ नोव्हेंबर २०२६
- नाशिक – २८ नोव्हेंबर २०२६
- जळगाव – २९ नोव्हेंबर २०२६
- ठाणे, पालघर, कल्याण व मुंबई – ३, ४, ५ व ६ डिसेंबर २०२६ (पनवेल केंद्र)
- रायगड – ७ डिसेंबर २०२६ (पनवेल केंद्र)
या प्राथमिक फेऱ्यांमधून निवड झालेल्या सर्वोत्कृष्ट एकांकिकांना महाअंतिम फेरीत आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
पनवेलमध्ये रंगणार तीन दिवसांचा महा नाट्यकुंभ!
अटल करंडकची बहुप्रतीक्षित महाअंतिम फेरी १८, १९ आणि २० डिसेंबर २०२६ रोजी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे रंगणार आहे. सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत सलग तीन दिवस नाट्यप्रयोगांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. राज्यभरातील निवडक एकांकिकांमधील रंगतदार स्पर्धा, कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन, लेखन आणि तांत्रिक कौशल्य यांचा अनोखा संगम या महाअंतिम फेरीत पाहायला मिळणार आहे.
विजेत्यांसाठी भरघोस पारितोषिके; ‘अटल करंडक’चा मान सर्वोच्च!
कलाकारांच्या मेहनतीला आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी यंदाही आकर्षक रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्हे देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
- प्रथम क्रमांक : ₹१,००,००० आणि मानाचा ‘अटल करंडक’
- द्वितीय क्रमांक : ₹७५,०००
- तृतीय क्रमांक : ₹५०,०००
- लक्षवेधी एकांकिका : ₹३०,०००
- विनोदी एकांकिका : ₹२०,०००
- उत्तेजनार्थ पारितोषिक : प्रत्येकी ₹१०,००० (दोन पारितोषिके)
प्रत्येक सहभागी संघाला आपले नाट्यकौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळावी आणि नव्या पिढीतील रंगकर्मींच्या कलाप्रवासाला प्रोत्साहन मिळावे, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे.

‘टीम अटल करंडक’ सज्ज; नियोजनाला वेग
या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धाप्रमुख नगरसेवक परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘टीम अटल करंडक’ने व्यापक तयारी केली आहे. अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, चिन्मय समेळ, अमोल खेर, शामनाथ पुंडे, स्मिता गांधी, वैभव बुवा, अनिल कोळी, आदित्य उपाध्ये, दिव्या शेठ, कोमल पाटील, निखिल गोरे, ऋतुपर्णा, रोहित देशमुख, प्रतिकेश मोरे, उमेश वाळके यांच्यासह संपूर्ण टीम विविध स्तरांवर नियोजन आणि समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहे.
राज्यभरातील नाट्यसंस्थांचा सहभाग, कलाकारांचा उत्साह आणि रसिकांचा प्रतिसाद यामुळे यंदाचा अटल करंडक अधिक भव्य आणि दिमाखदार होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
अटल करंडक म्हणजे केवळ स्पर्धा नाही, तर नव्या रंगकर्मींच्या स्वप्नांना मिळणारे व्यासपीठ आणि मराठी रंगभूमीच्या भविष्याला आकार देणारा एक सांस्कृतिक उत्सव आहे!
अधिक माहिती व समन्वयासाठी अमोल खेर (९८२०२३३३४९) किंवा गणेश जगताप (९८७०११६९६४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




Be First to Comment