Press "Enter" to skip to content

बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन, बाबासाहेबची धम्मक्रांतीआणि महाविहार मुक्ती आंदोलनावर मान्यवरांचे परखड विचार

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला व्यापक गती देण्यासाठी पाच कोटी प्रचारक निर्माण करण्याचा धम्मकाया मिशनचा संकल्प ; रसायनीत महाबोधी महाविहार प्रचार अभियान उत्साहात


रसायनी (आनंद पवार) : भारतीय बौद्ध संस्कृतीचा गौरवशाली इतिहास, भगवान गौतम बुद्धांचा मानवतावादी विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणलेली ऐतिहासिक धम्मक्रांती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासह बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला व्यापक गती देण्याच्या उद्देशाने धम्मकाया मिशन व रसायनी पाताळगंगा बहुजन विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले महाबोधी महाविहार प्रचार अभियान रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी रसायनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत झालेल्या या अभियानाचे अध्यक्षस्थान रसायनी पाताळगंगा बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आर.के.कांबळे यांनी भूषविले.या कार्यक्रमाला रसायनी पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी प्रमुख वक्त्यांनी बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन,महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची आवश्यकता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचे महत्त्व या विषयांवर अभ्यासपूर्ण व विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले.

बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन ही काळाची गरज:-अॅड माधुरी भालेराव(राष्ट्रीय संयोजिका,उपासिका संघ, धम्मकाया मिशन
यांनी’बौद्ध धर्म संस्कृतीचे पुनरुज्जीवन’या विषयावर आपले विचार मांडताना भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा हा बौद्ध संस्कृतीच्या मानवतावादी विचारांमध्ये असल्याचे प्रतिपादन केले.भारतीय संस्कृती ही केवळ वेशभूषा,भाषा किंवा बाह्य परंपरांवर अवलंबून नसून तिच्या केंद्रस्थानी न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये आहेत.भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण मानवजातीला माणसाने माणसाशी मैत्रीपूर्ण आणि समानतेने वागण्याचा संदेश दिला.माणसाच्या मनाचे परिवर्तन करून त्याला सुसंस्कृत,नीतिमान आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग बुद्धांनी दाखविला,असे त्यांनी स्पष्ट केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करण्यामागे सखोल वैचारिक भूमिका होती.बौद्ध धम्म हा भारताच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला असून भारताला बौद्धमय करण्याचे आणि बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचे ध्येय त्यांनी समोर ठेवले होते,असे त्यांनी नमूद केले.प्राचीन भारतातील नालंदा,तक्षशिला आणि विक्रमशिला यांसारखी विद्यापीठे,तसेच शिल्पकला, चित्रकला,लेखनकला, काव्यकला आणि स्थापत्यकलेच्या क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करून त्यांनी बौद्ध संस्कृतीचा समृद्ध वारसा अधोरेखित केला.

बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन करायचे असेल तर प्रत्येक घरात बुद्धांच्या विचारांना स्थान मिळाले पाहिजे.दररोज सकाळ-संध्याकाळ बुद्धपूजा, प्रत्येक आठवड्याला अष्टशील धारण करून उपोसथ व्रत,दर रविवारी विहारात उपस्थिती,शील, समाधी, प्रज्ञा यांचे आचरण, दान आणि मैत्रीभावना यांचा अंगीकार केला पाहिजे. तसेच बुद्धांच्या जीवनाशी संबंधित लेण्या,स्तूप,चैत्य आणि लुंबिनी,बुद्धगया,सारनाथ, कुशीनगर यांसारख्या पवित्र स्थळांना भेटी देऊन बुद्धविचारांची प्रेरणा घेतली पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी पाच कोटी प्रचारक घडविण्याचा संकल्प:-ॲड.प्रवीण पंडित (राष्ट्रीय अध्यक्ष,धम्मकाया मिशन) यांनी‘महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची दिशा’ या विषयावर मार्गदर्शन करताना बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध बांधवांचे अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे स्थान असल्याचे सांगितलेभगवान गौतम बुद्धांना याच भूमीत ज्ञानप्राप्ती झाली. जगभरातील बौद्ध अनुयायी या पवित्र स्थळाला भेट देऊन शील,समाधी आणि प्रज्ञेचा अभ्यास करण्याची प्रेरणा घेतात.मात्र,जगभरातील बौद्ध समाजाचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनावर बौद्धेतर धार्मिक परंपरेतील व्यक्तींचे नियंत्रण असल्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. या व्यवस्थापनाबाबत बौद्ध समाजाच्या अपेक्षा आणि धार्मिक अधिकारांचा प्रश्न महत्त्वाचा असून, महाविहाराच्या मुक्तीसाठी आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महाबोधी महाविहार परिसरात बौद्ध धम्माच्या मूळ तत्त्वांशी विसंगत असलेल्या धार्मिक प्रथा सुरू असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.या प्रश्नावर व्यापक जनजागृती करून बौद्ध समाजामध्ये महाबोधी महाविहाराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.या आंदोलनाला देशव्यापी स्वरूप देण्यासाठी धम्मकाया मिशनच्या माध्यमातून पाच कोटी महाबोधी प्रचारक निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.यासाठी प्रशिक्षित उपासक आणि उपासिका घडविण्याचे कार्य धम्मकाया मिशन गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने करीत आहे. महाबोधी महाविहाराचा इतिहास,त्याचे धार्मिक महत्त्व आणि मुक्ती आंदोलनाची भूमिका गावोगावी पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बाबासाहेबांची धम्मक्रांती समजून घेण्यासाठी तीन पुस्तके वाचणे आवश्यक :- प्रवीण गायकवाड
उपासक प्रवीण गायकवाड (राष्ट्रीय सचिव,धम्मकाया मिशन) यांनी‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती’ या विषयावर विचार मांडताना बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धर्मांतराचा प्रवास उलगडून सांगितला.१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे बाबासाहेबांनी‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी ऐतिहासिक घोषणा केली आणि १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्या घोषणेची पूर्तता केली. मात्र, बाबासाहेबांचा बौद्ध धम्माकडे झालेला प्रवास हा अचानक घडलेला नव्हता.त्यामागे अनेक वर्षांचा वैचारिक अभ्यास, चिंतन आणि सामाजिक परिवर्तनाची भूमिका होती,असे त्यांनी स्पष्ट केले.महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिष्य केळुस्कर गुरुजी यांनी बाबासाहेबांना भेट दिलेल्या भगवान बुद्धांच्या चरित्रग्रंथाचा त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडल्याचे त्यांनी सांगितले.
बाबासाहेबांची धम्मक्रांती समजून घ्यायची असेल, तर प्रत्येकाने तीन महत्त्वपूर्ण ग्रंथांचे वाचन केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यामध्ये १) बुद्ध आणि त्यांचा धम्म,२)बुद्ध की कार्ल मार्क्स आणि,३)क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथांचा समावेश आहे. या ग्रंथांचे सखोल वाचन केल्याशिवाय बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा वैचारिक पाया समजून घेणे आणि तिचा प्रभावी प्रचार व प्रसार करणे शक्य होणार नाही,असे त्यांनी ठामपणे सांगितले

प्रास्ताविक,सूत्रसंचालन कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सुमित भालेराव यांनी केले. त्यांनी अभियानाच्या आयोजनामागील भूमिका आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन विद्याताई खंडागळे यांनी केले,तर उपस्थितांचे आभार महेश गायकवाड यांनी मानले.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, उपासक,उपासिका आणि कार्यकर्त्यांसाठी पल्स मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे नामवंत डॉ.सागर कांबळे व त्वचारोगतज्ज्ञ डॉ.प्रणिता कांबळे(वानखेडे) यांच्या वतीने भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती.
एकूणच,रसायनी येथे पार पडलेल्या या महाबोधी महाविहार प्रचार अभियानाच्या माध्यमातून बौद्ध संस्कृतीचा गौरवशाली इतिहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचा विचार आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची दिशा याविषयी उपस्थितांमध्ये वैचारिक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता बुद्धांचा समता,मैत्री,करुणा आणि प्रज्ञेचा विचार घराघरांत पोहोचविण्याचा निर्धार या अभियानातून व्यक्त करण्यात आला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.