
रोहा : समीर बामुगडे
रोहा बदलतोय की रोह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत? खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोह्यात शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ऐतिहासिक श्रीराम मारुती चौकात झालेली तुडुंब गर्दी, शिवसैनिकांचा उत्साह आणि दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश यामुळे संपूर्ण रोह्यात भगवे वातावरण पाहायला मिळाले. रोह्याच्या राजकारणात या सभेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असताना रोह्यातील या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीसमोर नवे आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेल्या आणि स्थानिक पातळीवर जनसंपर्क असलेल्या दिग्गजांनीच शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सुप्रसिद्ध समाजसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पेण विधानसभा कार्याध्यक्ष प्रमोद दादा म्हसकर, पंचायत समिती सदस्य आणि ओबीसी समाजातील प्रभावी नेतृत्व सुरेश मगर, तसेच ज्येष्ठ समाजसेवक प्रदीप (आप्पा) देशमुख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला.
या सोहळ्याला राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी, रोह्याचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, शिवसेना नेते अशोक धोत्रे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
एकीकडे राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या रोह्यात शिवसेनेचे एवढे मोठे शक्तिप्रदर्शन, तर दुसरीकडे स्थानिक दिग्गजांची पक्षाला मिळालेली साथ, यामुळे आगामी राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची ही एन्ट्री केवळ पक्षप्रवेशापुरती मर्यादित राहणार की रोह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणार? याचे उत्तर आगामी काळात मिळेल. मात्र, या सभेने रोह्यातील राजकीय वातावरण नक्कीच तापवले आहे!



Be First to Comment