
प्रतिनिधी : सचिन पाटील | आवरे
आवरे येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलच्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थिनी कु. अक्षा गावंड हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची प्रेरणा घेत जलदुर्ग सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक आणि सुबक प्रतिकृती साकारली आहे. दिवाळीनिमित्त तिने आपल्या घराजवळ उभारलेल्या या किल्ल्याच्या प्रतिकृतीचे सारडे विकास मंच आयोजित किल्ले स्पर्धेत विशेष कौतुक व गौरव करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेला संघर्ष, त्यांची दूरदृष्टी, शौर्य आणि गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा इतिहास आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांनी दुर्गव्यवस्थेला विशेष महत्त्व दिले. समुद्रकिनाऱ्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने उभारलेला सिंधुदुर्ग जलदुर्ग हा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि स्थापत्यकौशल्याचा महत्त्वपूर्ण वारसा मानला जातो.

याच ऐतिहासिक वारशाची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि पराक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने अक्षा गावंड हिने सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारली. किल्ल्याची रचना, त्यातील बारकावे आणि सुबक मांडणी यामुळे तिच्या कलाकृतीने लक्ष वेधून घेतले.
अक्षाला लहानपणापासूनच किल्ले बनविण्याची आवड असून ती दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत असते. यंदाही तिने आपली ही आवड जपत सिंधुदुर्ग किल्ल्याची सुंदर प्रतिकृती उभारली. अभ्यासासोबतच ऐतिहासिक वारसा जपण्याची तिची ही आवड कौतुकास्पद ठरत आहे.
इतिहास हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे शौर्य आणि स्वराज्य स्थापनेमागील विचार विद्यार्थ्यांना समजावेत, तसेच त्यांच्यामध्ये इतिहासाविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी, या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे.
अक्षा गावंड हिने आपल्या कलाकृतीतून शिवकालीन इतिहासाविषयीची आवड आणि कल्पकता अधोरेखित केली असून तिच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे



Be First to Comment