
मुंबई प्रतिनिधी : सतीश पाटील
भिवंडी : तालुक्यातील आलीमघर येथील कु. मनदीप पाटील (वय १८) याची भारतीय नौदलात (Indian Navy) नाविक (अग्निवीर) म्हणून निवड झाली आहे. या निवडीनंतर आज त्याचा शपथविधी सोहळा पार पडला. मनदीपच्या या यशामुळे आलीमघर गावासह भिवंडी तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
मनदीप याला लहानपणापासूनच देशसेवेची आवड होती. भारतीय नौदलात भरती होण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्याने मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हे यश संपादन केले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने मिळवलेल्या या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे.

भारतीय नौदलात निवड झाल्यानंतर आलीमघर येथे ग्रामस्थांच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी गावातून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील तरुणांसाठी मनदीपचे यश प्रेरणादायी ठरत आहे. मनोरंजन, क्रीडा स्पर्धा आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असतानाच तरुणांनी शिक्षण, करिअर आणि देशसेवेच्या संधींकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मनदीपने देशसेवेचे ध्येय निश्चित करून त्या दिशेने केलेल्या प्रयत्नांतून हे यश मिळवले आहे.
त्याच्या या निवडीमुळे कुटुंबीयांसह आलीमघर गावाचा गौरव वाढला असून, भारतीय नौदलातील पुढील सेवेसाठी त्याला सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत. देशसेवा करताना त्याने आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



Be First to Comment