Press "Enter" to skip to content

देशातील सर्वाधिक बक्षीस रकमेची दिवाळी अंक स्पर्धा जाहीर!राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दीड लाखांचा; रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकासाठी ६० हजारांचे पारितोषिक; प्रथमच डिजिटल दिवाळी अंकांसाठी स्वतंत्र स्पर्धा


पनवेल (प्रतिनिधी) मराठी साहित्यविश्वात दिवाळी अंकांना अनन्यसाधारण महत्त्व असून, साहित्य, संस्कृती, कला आणि वैचारिक अभिव्यक्तीचा समृद्ध वारसा जपणाऱ्या या परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांत गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत यंदा भरीव वाढ करण्यात आली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या दिवाळी अंकाला तब्बल दीड लाख रुपयांचे पारितोषिक, तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी ६० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. भव्य पारितोषिक रक्कम आणि विविध साहित्यप्रकारांसाठी स्वतंत्र पुरस्कारांची तरतूद यामुळे ही स्पर्धा देशातील सर्वाधिक बक्षीस रकमेच्या दिवाळी अंक स्पर्धा ठरली आहे.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मराठी साहित्याची अभिरुची वृद्धिंगत व्हावी, नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना लेखनासाठी प्रोत्साहन मिळावे, संपादक आणि प्रकाशकांच्या सर्जनशील कार्याला योग्य व्यासपीठ मिळावे, तसेच दिवाळी अंकांच्या माध्यमातून जपली जाणारी साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा अधिक समृद्ध व्हावी, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे. यंदा लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राज्यस्तरीय स्पर्धेच्या प्रथम पारितोषिकाची रक्कम दीड लाख रुपये जाहीर केली असून, साहित्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी विविध विभागांमध्येही आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकासाठी प्रथम क्रमांकास १ लाख ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकास ४५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट कथेसाठी १० हजार ५०० रुपये, उत्कृष्ट कविता, लेख, परिसंवाद, मुलाखत, व्यंगचित्र आणि मुखपृष्ठ यांसाठी प्रत्येकी ७ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. बालसाहित्याच्या उत्कृष्ट अंकासाठी ११ हजार २५० रुपये, तर उत्कृष्ट विशेषांक आणि उत्कृष्ट दिवाळी अंकासाठी प्रत्येकी २२ हजार ५०० रुपयांची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. अशा प्रकारे साहित्याच्या विविध अंगांना प्रोत्साहन देत संपादकीय कल्पकता, आशयाची समृद्धता, लेखनातील वैविध्य आणि कलात्मक मांडणीचा गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वतंत्र जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील स्थानिक साहित्यिक, लेखक, कवी, व्यंगचित्रकार, संपादक आणि प्रकाशक यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि जिल्ह्यातील साहित्य चळवळीला अधिक बळकटी देणे, हा या विभागाचा उद्देश आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ६० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ७ हजार ५०० रुपये, तसेच उत्कृष्ट कथा, कविता आणि व्यंगचित्रासाठी प्रत्येकी ४ हजार ५०० रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

यंदाच्या स्पर्धेचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल माध्यमातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांनाही प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमच स्वतंत्र डिजिटल दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वाचनसंस्कृतीचा विस्तार, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि साहित्याच्या डिजिटल स्वरूपातील उपलब्धतेला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या विभागात प्रथम क्रमांकासाठी १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपयांची पारितोषिके मानपत्रासह प्रदान करण्यात येणार आहेत. त्यामुळे पारंपरिक मुद्रित दिवाळी अंकांसोबतच डिजिटल माध्यमातून साहित्यनिर्मिती करणाऱ्या संपादक आणि प्रकाशकांनाही आपल्या गुणवत्तेची छाप उमटविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मराठी साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात दिवाळी अंकांनी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कथा, कविता, ललित लेख, वैचारिक लेखन, परिसंवाद, मुलाखती, व्यंगचित्रे अशा विविध साहित्यप्रकारांच्या माध्यमातून दिवाळी अंकांनी अनेक लेखक, कवी आणि साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. नव्या पिढीतील लेखकांना प्रोत्साहन देतानाच अनुभवी साहित्यिकांच्या लेखनाचा ठेवा वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम दिवाळी अंक सातत्याने करत आहेत. या साहित्यिक परंपरेचा सन्मान करण्याबरोबरच दर्जेदार साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत आहे, असे मत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने व्यक्त केले आहे.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संपादक आणि प्रकाशकांनी आपल्या दिवाळी अंकाच्या दोन प्रतींसह १०० रुपये प्रवेश शुल्क रोख, धनादेश अथवा डीडीद्वारे १ डिसेंबर २०२६ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि स्पर्धा समन्वयक शैलेश शिर्के यांनी केले आहे. दिवाळी अंक पाठविण्याचा पत्ता : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, प्लॉट नं. ४७५, मार्केट यार्ड, पनवेल, जिल्हा रायगड – ४१०२०६. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी अनिल कोळी (९७६९४०९१६१) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच डिजिटल दिवाळी अंक स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले अंक mmps.president@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. ई-मेलच्या विषयामध्ये ‘स्पर्धेसाठी’ असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.


More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.