Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये वाहनांच्या चार बॅटऱ्या चोरी; दोन महिला आरोपींना अटकओएनजीसी गेट परिसरातील श्रद्धा हॉटेलसमोरील घटना; चोरीचा मुद्देमाल हस्तगत


पनवेल, दि.१३ (संजय कदम) : पनवेलमधील ओएनजीसी गेट परिसरात उभ्या असलेल्या डंपर आणि पोकलेनमधील चार बॅटऱ्या चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा पनवेल शहर पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी मानखुर्द येथील दोन महिलांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या चारही बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी काळुंद्रे गावातील रहिवासी रविंद्र हरिश्चंद्र पाटील (वय ७२) यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मालकीचा डंपर (एमएच ४६ बीबी ९७४०) आणि हुंदाई कंपनीची पोकलेन देखभाल-दुरुस्तीसाठी पनवेल ओएनजीसी गेटजवळील श्रद्धा हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत उभी करण्यात आली होती. याच ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी दोन्ही वाहनांमधील प्रत्येकी दोन अशा एकूण चार अॅमरॉन कंपनीच्या बॅटऱ्या चोरून नेल्या होत्या. या बॅटऱ्यांची एकूण किंमत २० हजार रुपये आहे.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सुनीता गणेश उपाध्ये (वय ३५) आणि सुजाता मंगल उपाध्ये (वय ३५, दोघीही रा. पीएमजी कॉलनी झोपडपट्टी, भाजी मार्केटजवळ, मानखुर्द, मुंबई) यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या चारही बॅटऱ्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली. या पथकात विशाल दुधे, सम्राट डाकी, अनिल चव्हाण, दत्ता जाधव, सचिन कोर, अभिजीत गडकरी आणि साईनाथ मोकळ यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण करीत आहेत.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.