
हिरानंदानी फॉर्च्यून सिटीतील तिहेरी मृत्यू प्रकरणात पुण्यातील विश्वनाथ देसाई रसायनी पोलिसांच्या जाळ्यात ; पत्नी अक्षरा देसाईचा शोध सुरू
रसायनी (आनंद पवार)
पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथील हिरानंदानी फॉर्च्यून सिटी परिसरात आर्थिक व्यवहाराच्या वादातून निर्माण झालेल्या कथित मानसिक छळाच्या पार्श्वभूमीवर आईसह दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला होता.या हृदयद्रावक प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड घडली असून,आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या पुण्यातील विश्वनाथ देसाई याला रसायनी पोलिसांनी अटक केली आहे.तर त्याची पत्नी अक्षरा विश्वनाथ देसाई हिचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे.
पनवेल तालुक्यातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरानंदानी फॉर्च्यून सिटी येथील मिनर्वा सोसायटीमध्ये सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास ही मन हेलावून टाकणारी घटना घडली होती.मानसी मच्छिंद्र पोपेटे (वय ३२) यांनी आपल्या रुद्र (वय ११) आणि हंसिका (वय ६) या दोन चिमुकल्या मुलांसह अकराव्या मजल्यावरून उडी घेतल्याने तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता.अवघ्या काही क्षणांत एका हसत्याखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.या घटनेने चौक,आसरे, खालापूर तालुका तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात शोककळा पसरली होती.आर्थिक व्यवहाराचा वाद, वारंवार फोन आणि धमक्यांचा आरोप
या घटनेच्या मुळाशी आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेला वाद असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.
मृत महिलेचे पती मच्छिंद्र नारायण पोपेटे (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,पुणे येथील विश्वनाथ देसाई हा त्यांना वारंवार फोन करून पैशांची मागणी करीत होता.तसेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास देऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.पैशांच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद पुढे कुटुंबाच्या मानसिक शांततेवरच घाला घालणारा ठरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या कथित छळामुळे पोपेटे कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली होते, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घरात घुसून दरवाजावर लाथा मारल्याचा गंभीर आरोप !
पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार, २ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास विश्वनाथ देसाई आणि त्याची पत्नी अक्षरा देसाई हे दोघेही हिरानंदानी फॉर्च्यून सिटी येथील मिनर्वा सोसायटीमधील पोपेटे यांच्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी मच्छिंद्र पोपेटे हे घरी उपस्थित नव्हते.यावेळी देसाई दाम्पत्याने घराच्या मुख्य दरवाजावर लाथा मारून दरवाजा उघडण्यास भाग पाडत घरात प्रवेश केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतर घरात उपस्थित असलेल्या मानसी पोपेटे आणि त्यांच्या मुलांना धमकावून मानसिक त्रास देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहेया कथित प्रकारानंतर काही वेळातच मानसी यांनी आपल्या दोन चिमुकल्यांसह टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली.अवघ्या ११ वर्षांचा रुद्र आणि सहा वर्षांची हंसिका यांचा अशा प्रकारे झालेला अंत संपूर्ण समाजमनाला चटका लावणारा ठरला.
रसायनी पोलिसांची घटनास्थळी धाव घटनेची माहिती मिळताच खालापूरचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल,रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव,महिला पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे,सहाय्यक फौजदार लालासाहेब कोळेकर,पोलीस हवालदार शिवाजी पानपट्टे,हेमंत कोकाटे,नितीन शेडगे,प्रसाद पाटील, विशाल पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल रुपेश सपकाळ, अमित डफळ,गिरीश नगरकर आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.तिन्ही मृतदेह पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी चौक येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. या वेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती.आपल्या कुटुंबातील तीन सदस्य गमावल्याने पोपेटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणी मच्छिंद्र नारायण पोपेटे यांनी रसायनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्या नंतर त्यांच्या तक्रारीवरून विश्वनाथ देसाई आणि त्याची पत्नी अक्षरा विश्वनाथ देसाई (दोघेही रा.पुणे) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८,३३३,३५२, ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर प्रकरणाचा तपास करताना रसायनी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.अखेर विश्वनाथ देसाई याला९ नोव्हेंबर रोजी मोठ्या शिताफीने रसायनी पोलिसांनी अटक करून कायद्याच्या कचाट्यात आणले आहे. विश्वनाथ देसाई याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १६ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.तर त्याची पत्नी अक्षरा देसाई हिचा शोध सुरू असून,या प्रकरणात तिची भूमिका काय होती, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.एका आर्थिक व्यवहाराच्या वादातून निर्माण झालेल्या कथित छळाच्या आरोपांनंतर आईसह दोन निष्पाप मुलांचा मृत्यू होण्याची ही घटना अत्यंत गंभीर आहे.या प्रकरणातील आर्थिक व्यवहाराचे नेमके स्वरूप,वारंवार करण्यात आलेले फोन,कथित धमक्या, घटनेच्या दिवशी घडलेला प्रकार आणि संबंधित व्यक्तींची भूमिका या सर्व बाबींचा सखोल तपास होणे महत्त्वाचे आहे.विश्वनाथ देसाई याच्या अटकेनंतर आता अक्षरा देसाईच्या शोधासह पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या महत्वपूर्ण घटनेचा अधिक तपास रसायली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव हे करीत आहेत


Be First to Comment