Press "Enter" to skip to content

कामोठे महा-किल्ला महोत्सव २०२६ चा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न !

२० सोसायट्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विजेत्यांचा सन्मान, सर्व सहभागींचा गौरव; २९ नोव्हेंबरला रायगड दर्शन मोहिमेचे आयोजन

कामोठे : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ल्यांचा समृद्ध वारसा आणि मराठी संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘कामोठे महा-किल्ला महोत्सव २०२६’ या किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या स्पर्धेत कामोठे परिसरातील तब्बल २० सोसायट्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ऐतिहासिक वारशाप्रती आपली आस्था व्यक्त केली.

विजेत्या सोसायट्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान

या स्पर्धेत हावरे निर्मिती (१ ते ७), सेक्टर २२ यांनी रायगड किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारत प्रथम क्रमांक पटकावला. स्टार हेवन सीएचएस लिमिटेड, सेक्टर ५ यांनी राजगड किल्ल्याची प्रतिकृती साकारत द्वितीय क्रमांक, तर चॅनल नेस्ट, सेक्टर ७ यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारत तृतीय क्रमांक मिळवला.

तिन्ही विजेत्या संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व २० सोसायट्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. किल्ल्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या प्रतिनिधी व संघांना ज्येष्ठ इतिहास संकलक आणि अभ्यासक आप्पा परब यांनी विविध गड-किल्ल्यांची माहिती देणारी पुस्तके भेट दिली. याशिवाय श्री. दशरथ पाटील लिखित ‘चला स्वप्नांच्या दुनियेत जाऊयात’ हे पुस्तक देऊनही सहभागींचा विशेष गौरव करण्यात आला.

विजेत्यांसह सर्व सहभागींसाठी विनामूल्य रायगड दर्शन

महोत्सवातील विशेष आकर्षण ठरली ती रायगड दर्शन मोहिमेची घोषणा. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सोसायटीच्या संपूर्ण संघासाठी विनामूल्य रायगड दर्शन आयोजित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य सर्व सोसायट्यांमधील सदस्यांसाठीही विनामोबदला एकदिवसीय रायगड दर्शन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

अजिंक्य स्टडी टुर्स अँड ॲडव्हेंचरचे सर्वेसर्वा श्री. अक्षय ननावरे यांच्या वतीने ही घोषणा करण्यात आली. रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी ही मोहीम आयोजित केली जाणार आहे. नव्या पिढीला इतिहासाची गोडी लागावी, गड-किल्ल्यांचे महत्त्व समजावे आणि प्रत्यक्ष रायगडाला भेट देऊन ऐतिहासिक वारशाचा अनुभव घेता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.

मान्यवरांची उपस्थिती

पारितोषिक वितरण समारंभाला बालकलाकार ऋत्विज होडगे, राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समितीचे श्री. दशरथ पाटील, श्री. संजय ननावरे तसेच शिवस्तुती सादरकर्ते आणि प्रख्यात गायक विक्रांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन

या महोत्सवाचे आयोजन शाळा… द नेक्स्ट इरा शाळेच्या मंदाकिनी गरुड-पाटील, भारत योग गुरुकुलचे श्री. राजेंद्र म्हात्रे, अजिंक्य स्टडी टुर्स अँड ॲडव्हेंचरचे श्री. अक्षय ननावरे (शाखाप्रमुख : सेक्टर १९ व २१, प्रभाग क्र. १२ – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), रोटरी क्लब मानसरोवरचे प्रेसिडेंट श्री. संजय रोकडे, रोटरियन डॉ. दीपक खोत आणि रोटरी इंटरॅक्ट क्लबचे प्रेसिडेंट कु. आयुष म्हात्रे यांनी संयुक्तपणे केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिव्या पाटील यांनी केले.

ऐतिहासिक वारसा जपणारा स्तुत्य उपक्रम

या सोहळ्याला उपस्थित पालक, सहभागी सोसायट्यांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांनी महोत्सवाच्या आयोजनाचे विशेष कौतुक केले. किल्ले बांधणीच्या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांमध्ये इतिहासाविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच सामाजिक एकोपा, सांस्कृतिक जाणीव आणि सामूहिक सहभागाची भावना वृद्धिंगत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

भविष्यात हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आणि मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यासाठी आयोजकांना प्रोत्साहनही देण्यात आले.

गड-किल्ले म्हणजे केवळ दगड-मातीच्या वास्तू नसून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे, स्वराज्याच्या संघर्षाचे, स्वाभिमानाचे आणि मराठी अस्मितेचे प्रतीक आहेत. हा ऐतिहासिक वारसा जतन करून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने ‘कामोठे महा-किल्ला महोत्सव २०२६’ हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.