Press "Enter" to skip to content

बबनदादांच्या कार्याचा वारसा कैलास आणि प्रगती पाटील समर्थपणे पुढे नेत आहेत ! माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या हस्ते नगरसेविका प्रगती कैलास पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन


पनवेल, दि.१७ (वार्ताहर) : नगरसेविका प्रगती कैलास पाटील यांच्या तळोजा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना अनंत गिते यांनी बबनदादा पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव केला. कैलास पाटील आणि प्रगती पाटील हे बबनदादा पाटील यांनी निर्माण केलेला लोकसेवेचा वारसा समर्थपणे पुढे नेत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

बबनदादा पाटील यांनी आपल्या कार्यातून जनसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याची त्यांची भूमिका राहिली. हाच लोकसेवेचा विचार कैलास पाटील आणि नगरसेविका प्रगती पाटील यांच्या माध्यमातून पुढे जात असल्याचे अनंत गिते यांनी नमूद केले.
यावेळी बबनदादा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. जनतेने आजवर दिलेले प्रेम आणि विश्वास हीच आपल्या कार्याची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि त्यांच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे उभे राहणे, हीच लोकप्रतिनिधींची प्राथमिकता असली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कैलास पाटील आणि प्रगती पाटील यांच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. जनसंपर्क कार्यालय हे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मांडण्याचे आणि त्यावर पाठपुरावा करण्याचे प्रभावी केंद्र ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे कार्यालय परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. नागरी समस्या, मूलभूत सुविधा, विकासकामे तसेच नागरिकांच्या विविध तक्रारी जाणून घेऊन त्यांचा संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यावर भर दिला जाणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बबनदादा पाटील यांच्या कार्याचा गौरव, अनंत गिते यांचे मार्गदर्शन आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती यामुळे या उद्घाटन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.