
खालापूर तालुक्यातील ताकई गावात आढळला दुर्मिळ मांडूळ साप, सर्पमित्रांच्या तत्परतेने सुरक्षित रेस्क्यू
खालापूर : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील ताकई गावाच्या हद्दीत १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेतजमिनीजवळ मांडूळ जातीचा दुर्मिळ साप आढळून आला. या सापाला कोणतीही इजा न पोहोचता सुरक्षितपणे पकडून त्याचे योग्य ठिकाणी पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने स्थानिक रहिवासी सुमित आणि नयन पाटील या युवकांनी तत्परतेने सर्पमित्रांशी संपर्क साधला.
या बाबत माहिती मिळताच सर्पमित्र दिनेश ओसवाल यांनी गुरुनाथ साठेलकर यांच्यासमवेत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पाहणी करून आवश्यक ती खबरदारी घेत त्यांनी मांडूळ जातीच्या या सापाचे सुरक्षित रेस्क्यू ऑपरेशन केले. पूर्ण वाढ झालेल्या सापाला कोणतीही इजा न होता या सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात सर्पमित्रांना यश आले.
या मांडूळ सापाच्या रेस्क्यूची माहिती तत्काळ खालापूर तालुका वन विभागाला देण्यात आली. मांडूळ सापाबाबत समाजात अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा प्रचलित आहेत. त्याच्या नावाने मोठ्या आर्थिक व्यवहारांच्या अफवा पसरवल्या जातात. याच अंधश्रद्धेतून अशा दुर्मिळ सापांची बेकायदेशीर तस्करी, खरेदी-विक्री आणि विविध प्रकारे गैरवापर होण्याचा धोका असतो. त्यामुळे या वन्यजीवाचे संरक्षण करून त्याचे नियमानुसार पुनर्वसन करणे आवश्यक होते.

खालापूर तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने पुढील कार्यवाही केली. वन रक्षक राजेश खांडेकर आणि बाळू रोडे यांनी आवश्यक ती तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून मांडूळ जातीच्या या सापाला सुरक्षित वनक्षेत्रात अर्थात त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. सर्पमित्र आणि वन विभाग यांच्या समन्वयातून ही संपूर्ण रेस्क्यू मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.
या मोहिमेत अमोल ठकेकर, सुनील पुरी, अमोल कदम यांच्यासह अन्य सर्पमित्रांनीही मोलाचे सहकार्य केले. वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव यांनी सर्पमित्रांनी दाखवलेली तत्परता आणि वन्यजीव संरक्षणासाठी घेतलेली जबाबदारी यांचे कौतुक केले. तसेच वेळेवर माहिती देऊन सहकार्य करणारे जागरूक नागरिक सुमित आणि नयन पाटील यांचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले.
दरम्यान, खालापूर तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मांडूळसारखे दुर्मिळ वन्यजीव आढळल्यास कोणत्याही अंधश्रद्धेला किंवा अफवांना बळी पडू नये. अशा दुर्मिळ वन्यजीवांना पकडणे, इजा पोहोचवणे अथवा त्यांच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीत सहभागी होणे टाळावे. वन्यजीव आढळल्यास त्याला त्रास न देता तातडीने वन विभागाला किंवा सर्पमित्रांना माहिती द्यावी. वन्यजीवांचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असून, त्यासाठी नागरिकांनी जागरूकता आणि सहकार्य दाखवावे, असे आवाहन केले आहे.


Be First to Comment