Press "Enter" to skip to content

पनवेल, नवी मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला मिळणार नवी गती !

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून मुंबई-दिल्ली महामार्गाच्या कामाची पाहणी

पनवेल (प्रतिनिधी) देशाच्या पायाभूत सुविधा विकासातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-दिल्ली महामार्गाच्या कामाला वेग आला असून, पनवेल तालुक्यातील शिरवली गाव आणि मोरबे परिसरात सुरू असलेल्या कामाची भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रत्यक्ष स्थळभेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी महामार्गाच्या कामाची सद्यस्थिती, प्रकल्पाची प्रगती, तांत्रिक बाबी आणि कामातील विविध टप्प्यांचा सविस्तर आढावा घेतला.

जेएनपीए बंदर आणि लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या या महत्त्वपूर्ण महामार्गामुळे पनवेल आणि नवी मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे. या महामार्गामुळे मालवाहतुकीसह प्रवासी वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार असून, प्रवासाचा वेळ कमी होऊन वाहतूक अधिक जलद, सुलभ आणि सुरक्षित होण्यास हातभार लागणार आहे. परिणामी, परिसरातील औद्योगिक, व्यावसायिक आणि आर्थिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. महामार्गाच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या स्थानिक प्रश्नांसह शेतीकडे जाणारे रस्ते, पाण्याचा निचरा, भूसंपादन आणि इतर मूलभूत सुविधांबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. विकासकामे मार्गी लावताना स्थानिक नागरिक आणि शेतकरी बांधवांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे परिसराच्या विकासाला गती मिळत असतानाच स्थानिक नागरिकांच्या हिताचेही संरक्षण झाले पाहिजे, या भूमिकेतून आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पाहणी दौऱ्यात संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी, संबंधित अधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.