
उलवे, ता. १७ – उरणची लेक प्रियांशी मयूर पाटील हिने अवघ्या १४ व्या वर्षी नुकत्याच झालेल्या युवा ऑलिंपिकमध्ये विंडसर्फिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. युवा ऑलिंपिकमध्ये २३ देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. त्या सर्वांना त्या त्या देशाने कोच उपलब्ध करून दिला होता. मात्र प्रियांशीला कोच नव्हता. तरीही युवा आलिंपिकमध्ये ती सहावी (टॉप- १०) आली. अतिशय कमी वयात तिने केलेली कामगिरी उल्लेखनीय असल्याने आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना तिचा सार्थ अभिमान आहे. ती उरणची लेक आहे. रायगड कन्या आहे. प्रियांशी ही २०२५ आणि २०२६ मधील डबल एशियन मेडलिस्ट आहे. तिने गेल्या वर्षभरात १५ नॅशनल आणि ३ इंटरनॅशनल पदके पटकावली आहेत. ती एक उत्तम जलतरणपटूही आहे. त्यामुळे सध्या तिचे नाव जगभर चर्चिले जात आहे. कुठल्याही प्रशिक्षकाशिवाय तिने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे तिची जगभरातील मीडियाने दखल घेतली.
तिच्या घरची परिस्थिती नाजूक असल्याने आई-वडिलांना तिचा विविध स्पर्धांना जाण्याचा आणि प्रशिक्षणाचा खर्च पेलवत नाही. मात्र आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आजपर्यंत तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. ज्या ज्या वेळी तिला गरज होती त्या त्या वेळी महेंद्रशेठ घरत यांनी तिला आर्थिक सहकार्य केले आहे. आई (रुचिका), वडील (मयूर पाटील) यांची कठोर मेहनत आणि महेंद्रशेठ घरत यांची सहकार्याची भूमिका युवा ऑलिंपिकमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या प्रियांशीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यामुळेच प्रियांशी आणि तिच्या आई-वडिलांचा जाहीर सत्कार व्हावा, असे महेंद्रशेठ घरत यांना वाटत असल्याने यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी शेलघर येथील समाज मंदिरात तिचा आई-वडिलांसह यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.




Be First to Comment