
नवीन पनवेल : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रतिष्ठानमध्ये सुरू असलेल्या गायन, तबला, हार्मोनियम, नृत्य, अबॅकस, जिम्नॅस्टिक्स आणि तायक्वांदो या विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी मुलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. गेम होस्ट सुचीता यांनी खेळांचे उत्तम नियोजन करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. खेळ, गाणी आणि धमाल यामुळे बालदिनाचा आनंद द्विगुणित झाला.
संस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून बालदिन आणि महिला दिन यांसारखे विविध उपक्रम साजरे केले जातात. तसेच विविध सामाजिक संस्थांना भेटी देऊन तेथेही वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. प्रतिष्ठानच्या मुख्य संचालिका ॲड. सुरेखा भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी व कुशल शिक्षकांच्या सहकार्याने विविध प्रशिक्षण वर्ग चालवले जात आहेत.
संस्थेचे हे दुसरे वर्ष असून, अल्पावधीतच नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय आहे. नवीन पनवेलमधील प्रशस्त वास्तूमध्ये विविध कला, क्रीडा आणि कौशल्यविकासाचे प्रशिक्षण एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकसित करण्याची संधी मिळत आहे. अशा विविधांगी शैक्षणिक व कलात्मक उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी या संस्थेला प्रत्येकाने एकदा तरी आवर्जून भेट द्यावी.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध संधी उपलब्ध करून देणाऱ्या संस्कार प्रतिष्ठानचा बालदिन सोहळा आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला.




Be First to Comment