
पनवेल, दि.२२ (वार्ताहर) : मार्केट यार्ड परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासह पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रभाग क्रमांक ९९ मधील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि नवीन पावसाळी गटार (स्टॉर्म वॉटर लाईन) उभारण्याच्या कामांना महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचे नगरसेवक सुमित झुंजारराव यांनी स्वागत केले. मात्र, कामे केवळ मंजूर न ठेवता ती तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण आणि दर्जेदार व्हावीत, यासाठी काटेकोर नियोजन करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.
या विकासकामांमध्ये गुरुशरणम सोसायटी ते कोळीवाडा स्मशानभूमी मार्गासह मार्केट यार्डला जोडणाऱ्या अॅप्रोच रोड्सचा समावेश आहे. करंजाडे येथून पनवेलकडे येणाऱ्या पुलाशी या रस्त्यांची जोडणी होणार असल्याने परिसरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या मार्गाचा उपयोग प्रभाग क्रमांक १९ सह आसपासच्या परिसरातील नागरिकांनाही होणार असल्याचे झुंजारराव यांनी नमूद केले.
पावसाळी गटारांच्या कामांबाबत त्यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या तांत्रिक सूचना केल्या. गटारांचे आकारमान आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उतार यांची तज्ज्ञांकडून तपासणी करूनच काम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच खाडीकडे जाणाऱ्या पावसाळी गटारांच्या बाहेर पडण्याच्या ठिकाणी योग्य क्षमतेचे फ्लॅप गेट बसवावेत. त्यामुळे भरतीच्या वेळी खाडीचे पाणी उलट दिशेने वस्तीत शिरण्यास प्रतिबंध होईल आणि पाण्याचा निचरा सुरळीत राहील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि पावसाळी गटारांची सक्षम व्यवस्था एकाच वेळी उभारल्यास मार्केट यार्डमधील व्यापारी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे कामांच्या अंमलबजावणीत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून गुणवत्ता आणि तांत्रिक बाबींशी तडजोड करू नये, अशी भूमिका सुमित झुंजारराव यांनी मांडली. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी महासभेचे आभार मानले.



Be First to Comment