
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू
रसायनी (आनंद पवार)
घर हे प्रत्येकासाठी सुरक्षिततेचे आणि विश्वासाचे ठिकाण मानले जाते.मात्र,घरातच महिलेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर परिसरात उघडकीस आली आहे. एका ५१ वर्षीय महिलेच्या घरात तोंडाला काळा मास्क लावून प्रवेश करत त्यांच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून संजय दामोदर म्हात्रे याच्या विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवनगर परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय ?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.२१)ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास शिवनगर येथे हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारदार ५१ वर्षीय महिला आपल्या घरी असताना,याच परिसरात राहणाऱ्या संजय दामोदर म्हात्रे याने तोंडाला काळा मास्क लावून महिलेच्या घरात प्रवेश केल्याचा आरोप आहे.घरातील हॉलमधून तो थेट देवघरात गेला.त्यावेळी घरात अनोळखी व्यक्ती आल्याचे लक्षात येताच महिलेने त्याला ‘तू कोण आहेस?’ अशी विचारणा केली.मात्र,संबंधित व्यक्तीने हुंकारासारखा आवाज काढत महिलेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर महिलेची मान खाली वाकवून तिच्या पाठीवर हात फिरवत तिच्याशी गैरवर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या प्रकारामुळे महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

महिलेच्या आरडाओरड्यानंतर आरोपीने काढला पळ
घरात घडत असलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने जोरात आरडाओरडा केला.महिलेचा आवाज ऐकताच संबंधित व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर महिलेने या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
संजय म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल
महिलेच्या तक्रारीची दखल घेत रसायनी पोलिसांनी संजय म्हात्रे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS),२०२३ मधील कलम ७४ आणि ३३३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार प्रांजली पाटील करीत आहेत.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती केली जात असतानाही घरातच अशा प्रकारच्या गैरवर्तनाच्या घटना समोर येणे ही चिंतेची बाब आहे.महिलांना घरात आणि घराबाहेरही सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक आहे.शिवनगरमधील या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून,पुढील तपासाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



Be First to Comment