Press "Enter" to skip to content

हायकल कंपनीतील कामगारांसाठी तब्बल 20 हजार रुपयांची भरघोस पगारवाढ !!

कामगार नेते, महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाची कमाल !! : कामगारांनी मानले महेंद्रशेठ घरत यांचे आभार !

उलवे : हायकल प्रा. लिमिटेड तळोजा या कंपनीत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाने कामगारांसाठी दिवाळीआधीच धमाका केला आहे. चक्क २० हजार रुपयांची दणदणीत पगारवाढ देण्याचा अभूतपूर्व करार शुक्रवारी (ता. २३) करण्यात आला. न्यू मॅरिटाईम अण्ड जनरल कामगार संघटनेचे (एनएमजीकेएस) संस्थापक-अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात हा या वर्षातील बारावा करार आहे.

यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “यापूर्वी अनेक संघटना ‘हायकल’ मध्ये होत्या, परंतु आमच्या संघटनेने हायकलमध्ये कामगारांना सतत भरघोस पगारवाढीचे करार केले. मी नेहमीच कामगारांना सांगतो, कंपनी जगली, तिची भरभराट झाली तर तुमचेही भले होईल. त्यामुळे कामगारही इमानेइतबारे काम करीत आहेत.  कामचुकार कामगारांना पाठीशी घातले जाणार नाही, मात्र त्याचवेळी विनाकारण कुठल्याही कामगारावरील अन्यायही सहन केला जाणार नाही. हायकलच्या व्यवस्थापनाने आजपर्यंत उत्तम सहकार्य केले आहे. त्यामुळे व्यवस्थापनाचे मी आभार मानतो.”

व्यवस्थापनाच्या वतीने जनरल मॅनेजर (एचआर) विशाल पाटील म्हणाले, “आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी नेहमीच सकारात्मक आणि सौहार्दाची भूमिका घेतली. कधीही कंपनीत बंद, आंदोलन हा प्रकार त्यांनी केला नाही. नेहमीच त्यांनी कंपनीच्या प्रगतीच्या दृष्टीनेही मोलाची भूमिका निभावली आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत करार करताना आनंद होत आहे. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.”

‘हायकल’च्या कामगारांना यावर्षी ४४ हजार रुपये बोनस, तर पाचव्या वर्षी ५४ हजार रुपये बोनस मिळणार आहे. अडीच लाखांचा मेडिक्लेम, विशेष म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतरही ६५ व्या वर्षांपर्यंत मेडिक्लेमचा लाभ कामगारांना मिळणार आहे. त्यामुळे असा लाभ कामगारांना देणारी हायकल प्रा. लि. ही तळोजा एमआयडीसीत पहिलीच असल्याचा अभिमान कामगारांना आहे. तसेच फेस्टिव्हल अॅडव्हान्स आणि इतरही सुविधा कामगारांना मिळणार आहेत. त्यामुळे कामगार अत्यानंदात असून त्यांनी महेंद्रशेठ घरत यांचे आभार मानले आहेत. 
यावेळी एनएमजीकेएसचे सरचिटणीस वैभव पाटील, व्यवस्थापनाच्या वतीने जनरल मॅनेजर (एचआर) विशाल पाटील, एचआर मॅनेजर देवेंद्र पालेकर, तर कामगार प्रतिनिधी पी. एस. म्हात्रे, निलेश कदम, जयंत म्हात्रे, हनुमंत पवार आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.