आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन पुरुषोत्तम भोईर यांच्या पुढाकाराने पुस्तकाचे संपादन
पनवेल/ प्रतिनिधी
शारदीय नवरात्रोत्सवाच्या नवव्या माळेच्या रात्री मा.आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते "रोडमॅप अभ्यासक्रमाचा" पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. तरुणाईच्या उदंड प्रतिसादामध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. दहावी आणि बारावीच्या विद्यापीठ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आगामी करियर अभ्यासक्रम निवडण्याकरता मार्गदर्शनपर पुस्तकाचे आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन पुरुषोत्तम भोईर यांच्या पुढाकाराने सदर पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांकरता या पुस्तकाचे विनामूल्य प्रसारण करण्यात येणार आहे.
विचुंबे येथे शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत साई संदेश वेल्फेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित नवरात्र उत्सवात सदर प्रकाशन सोहळा संपन्न झाला. माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनुषंगाने आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल चे चेअरमन तथा शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर यांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शनापर पुस्तकाचे संपादन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार मंदार दोंदे यांनी सदर पुस्तकातील मजकुराचे संकलन केले आहे तर नवी मुंबईतील प्रिंट ऑन सोल्युशन्स चे संचालक प्रशांत चातुर्य यांनी या पुस्तकाची छपाई केली आहे.
प्रकाशन सोहळ्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना सन्माननीय बाळाराम पाटील म्हणाले की आजच्या जनरेशन झेड विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक असणारे पुस्तक पुरुषोत्तम भोईर यांनी प्रकाशित केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षक आणि पालकांना देखील मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अभ्यासक्रमांच्या माहिती सोबतच समाजाला पुरोगामी आणि प्रगतीवादी दिशा देणाऱ्या महापुरुषांचा संक्षिप्त परिचय तरुणाईला देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हा प्रकार कौतुकास्पद असून मी पुस्तक निर्मात्यांचे अभिनंदन करतो. आज पुरुषोत्तम भोईर यांच्या माध्यमातून ५०० पुस्तके उपलब्ध केली गेली आहेत. या पुस्तकाचा दर्जा पाहता आणखीन छपाई करावी लागल्यास ती पुरुषोत्तम भोईर यांनी करावी असा मी त्यांना आग्रह करतो. गरज पडल्यास आपल्या क्षेत्रातील अमराठी लोकांकरता इंग्रजी माध्यमातून देखील सदर पुस्तक प्रकाशित करावे असे देखील बाळाराम पाटील म्हणाले.
पुस्तक प्रकाशनापाठीमागची भूमिका विशद करताना पुरुषोत्तम भोईर म्हणाले की एखाद्या गावामध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले म्हणजे त्या गावाचा विकास झाला असे होत नाही. त्या गावातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची बौद्धिक पातळी किती आहे? तसेच महाविद्यालयीन तरुण आणि तरुणांची अध्ययन करण्याची क्षमता किती आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी व तरुणांची अध्ययन क्षमता वाढविण्याकरता त्या गावातील लोकप्रतिनिधी किती प्रयत्न करत आहेत? यावर त्या गावाचा विकास अवलंबून असतो. या पुस्तकाची खरी प्रेरणा ही बाळाराम पाटील साहेब यांच्यामुळेच आम्हाला प्राप्त झाली आहे. आपली आगामी पिढीने स्वतःच्या आवडीच्या शिक्षणक्षेत्रामध्ये करियर केले पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे. याच प्रामाणिक भावनेतून मी माझ्या सहकाऱ्यांच्या समवेत सदर पुस्तकाची निर्मिती केली आहे. अशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल,विचुंबे येथे सदर पुस्तकाच्या प्रती दहावी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकरता विनामूल्य उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचे ओळखपत्र दाखविल्यानंतर त्यांना विनामूल्य प्रत प्रदान करण्यात येईल.
तरुणाईच्या प्रचंड प्रतिसादामध्ये संपन्न झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मा आमदार बाळाराम पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवेंद्र मढवी, उपसभापती सुनील सोनावळे, संचालक देवेंद्र पाटील उर्फ देवा, पनवेल पंचायत समितीच्या माजी सभापती प्रणाली पुरुषोत्तम भोईर, विचुंबे ग्रामपंचायत सदस्य सतीश म्हात्रे, सदस्य तथा माजी सैनिक समीर दुंदरे, अतुल भोईर, सदस्या धनश्री भोईर, संचिता पाटील, करुणा म्हात्रे,पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Be First to Comment