
प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन आयु . नितीन मस्के साहेब बौद्धाचार्य यांचे मार्गदर्शन
करंजाडे (पनवेल), दि. २० ऑक्टोबर २०२६ :
करंजाडे येथे प्रबुद्ध सामाजिक संस्था, करंजाडे-पनवेल यांच्या वतीने मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला करंजाडे परिसरातील बौद्ध समाजबांधव, महिला, युवक व धम्मभगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी आयु. नितीन मस्के सर बौध्दाचार्य यांनी उपस्थित धम्मबांधव व धम्मभगिनींना प्रबोधनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. तथागत गौतम बुद्धांचा धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने अधोरेखित करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आयु. कुणाल लोंढे, ॲड. अमित कांबळे, गोकुळ सोनावणे, अशोक शेळके, सचिन सोनवणे, अमित ससाणे, उपासिका- उज्वला सोनवणे, कल्पना कांबळे, आरती लोंढे, वर्षा कांबळे, डॉ. सायली ससाणे, शैला सोनावणे, नैना देवारे, रुपाली म्हस्के, आम्रपाली कांबळे, समिधा तांबे, माया शेळके यांच्यासह करंजाडे परिसरातील धम्मबांधव व धम्मभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ उत्सव नसून सामाजिक परिवर्तन, मानवता, समता आणि बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देणारा ऐतिहासिक दिवस आहे. या दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या धम्ममार्गाचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.
प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमामुळे करंजाडे परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले. उपस्थित धम्मबांधव व धम्मभगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


Be First to Comment