

पनवेल (प्रतिनिधी) पळस्पे येथे गवंडी व चोरघे परिवाराच्यावतीने कुलदैवत उत्सवानिमित्त नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या सांगीतिक मैफिलीत पंडित उमेश चौधरी आणि कुमारी ज्ञानेश्वरी गाडगे यांच्या सुरेल गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. शास्त्रीय संगीत, अभंग आणि भक्तिरचनांच्या सुरेल आविष्कारातून रंगलेल्या या मैफिलीने उपस्थितांना भक्तिरसाबरोबरच संगीत आनंदाची अविस्मरणीय अनुभूती दिली.
मैफिलीची सुरुवात पंडित उमेश चौधरी यांनी राग अडाणा मधील ‘माता कालिका’ या बंदिशीने केली. त्यानंतर कुमारी ज्ञानेश्वरी गाडगे यांनी राग बसंत बहारमधील ‘केतकी गुलाब’ ही बंदिश सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. पुढे पंडित चौधरी यांनी ‘सुखाचे सुख’ हा अभंग, तर ज्ञानेश्वरी गाडगे यांनी ‘हरी म्हणा, गोविंद म्हणा’ हा भक्तिरसपूर्ण अभंग सादर केला. ‘नाम तुझे बरवा’ या अभंगातून पंडित चौधरी यांनी भक्तिभावाची अनुभूती दिली. ज्ञानेश्वरी गाडगे यांनी ‘बारम्मा लक्ष्मी’ हा कन्नड अभंग आणि त्यानंतर गौळण सादर करून मैफिलीत वेगळी रंगत आणली.

कार्यक्रमाच्या अखेरीस पंडित उमेश चौधरी आणि कुमारी ज्ञानेश्वरी गाडगे यांनी एकत्रितपणे ‘भवानी दयानी’ आणि ‘हेची दान देगा देवा’ या भैरवीतील रचना सादर केल्या. या सुरेल सादरीकरणाने मैफिलीची भावपूर्ण सांगता झाली. या मैफिलीचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे पखवाजवादक पंडित प्रतापराज पाटील आणि तबलावादक पंडित प्रसाद पाध्ये यांची रंगलेली जुगलबंदी. दोन्ही कलाकारांच्या तालबद्ध, दमदार आणि आकर्षक वादनाने रसिकांची विशेष दाद मिळवली. संपूर्ण मैफिलीत कुमारी कार्तिकी गाडगे हिने हार्मोनियमची सुरेल साथ देत आपल्या वादनकौशल्याची छाप पाडली.
कार्यक्रमस्थळी कलाकारांचे आगळ्यावेगळ्या आणि हृदयस्पर्शी पद्धतीने स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, निरंजनाने औक्षण आणि सुंदर पुष्पवृष्टी करून कलाकारांचा सन्मान करण्यात आला. या प्रेमळ स्वागताने कलाकारही भारावून गेले. विशेष म्हणजे, कार्यक्रमाच्या अखेरपर्यंत रसिक श्रोते मोठ्या तल्लीनतेने उपस्थित राहिले. प्रत्येक सादरीकरणाला त्यांनी मनापासून दाद देत संगीताचा मनमुराद आनंद घेतला. रसिकांचे प्रेम, संगीताप्रती असलेली निष्ठा आणि कलाकारांच्या कलेला मिळालेली उत्स्फूर्त दाद यांमुळे ही मैफल केवळ सांगीतिक कार्यक्रम न राहता कलाकार आणि रसिक यांच्यातील भावबंध जपणारा अविस्मरणीय सोहळा ठरली. या संस्मरणीय मैफिलीच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक धनंजय गवंडी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या प्रेमळ आयोजनामुळे आणि सहकार्यामुळे नवरात्रोत्सवातील हा सांगीतिक सोहळा रसिकांच्या स्मरणात राहणारा ठरला.


Be First to Comment