
पनवेल, दि.१९ (वार्ताहर) : खारघर शहरातील रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या काही जाहिरात फलकांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रौनक ॲडव्हर्टायझिंग कंपनीच्या जाहिरात व्यवस्थेशी संबंधित असल्याचे सांगितले जाणारे काही फलक वाकलेल्या व खाली झुकलेल्या अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी विद्युत वायर उघड्या आणि अस्ताव्यस्त दिसत आहेत. या प्रकाराची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खारघरचे माजी उपशहरप्रमुख नंदू वारुंगसे यांनी प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.
खारघरमधील रस्त्यालगत आणि दुभाजक परिसरात उभारलेले काही जाहिरात फलक रस्त्याच्या दिशेने झुकलेले असल्याने ते कोसळल्यास वाहनचालक आणि पादचाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच फलकांच्या खांबांजवळील उघड्या विद्युत तारांमुळे विद्युत सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे संबंधित फलकांची संरचनात्मक आणि विद्युत तपासणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज आहे.
नंदू वारुंगसे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली असून, संबंधित प्रशासनाने जाहिरात फलकांच्या परवानग्या, सुरक्षितता आणि देखभालीची तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास जबाबदारांवर कारवाई करून धोकादायक फलकांची तातडीने दुरुस्ती किंवा आवश्यकतेनुसार हटविण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. संभाव्य दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने वेळीच पावले उचलून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.


Be First to Comment