
दिशा महिला मंच आयोजित आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून महिला सन्मानासह सांस्कृतिक परंपरांचा जागर
पनवेल : प्रतिनिधी
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दिशा महिला मंच आयोजित व आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून महिला सन्मानासह सांस्कृतिक परंपरांचाही जागर करण्यात आला.
या सोहळ्यात सुजाता बत्तीन, मनीषा काटकर, मंदाकिनी पाटील, अंजली तावटे, किरण जुनगडे, वृषाली सूर्यवंशी, मधुरा दंडवते, सुवर्णा तोंडुलकर आणि गौरी क्षीरसागर या महिलांना नवदुर्गा पुरस्काराने गौरविण्यात आले. आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक व समाजसेविका मोहिनीताई पाटील, नगरसेविका स्नेहलताई धमाले तसेच छायाताई पाटील तसेच दिशा व्यासपीठाच्या संस्थापक निलम आंधळे व विद्या मोहिते यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमात महिलांनी देवीच्या विविध रूपांतील आकर्षक वेशभूषा करून उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्याचबरोबर महाभोंडला आणि मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक गाणी, खेळ आणि देवीच्या विविध रूपांच्या सादरीकरणातून महिलांनी भक्ती, संस्कृती आणि स्त्रीशक्तीचा अनोखा संगम अनुभवला. या उपक्रमातून दुर्गेचा जागर करत महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.
समाजात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांच्या योगदानाची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि इतर महिलांनाही समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने नवदुर्गा पुरस्कार सोहळा गेल्या सात वर्षांपासून सातत्याने आयोजित केला जात आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि संस्कृती संवर्धन यांचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


Be First to Comment