Press "Enter" to skip to content

सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ लॉमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अभिमुखता कार्यक्रम उत्साहात संपन्न ; मान्यवरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; कायद्याच्या शिक्षणासोबत नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी जपण्याचे आवाहन

पनवेल (प्रतिनिधी) सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ लॉ, पनवेल येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी १७ ऑक्टोबर रोजी अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्यपद्धतीची ओळख करून देणे, कायद्याच्या शिक्षणातील विविध संधींची माहिती देणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला योग्य दिशा देणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि गणेश पूजनाने झाली. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अवनी मिस्त्री यांनी स्वागतपर भाषणातून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, शिस्त, विविध उपक्रम, परीक्षा पद्धती तसेच कायद्याच्या अभ्यासासोबत व्यावहारिक ज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल न्यायालयातील अधिवक्ता, लेखापरीक्षक व कायदेशीर सल्लागार ॲड. भूषण म्हात्रे उपस्थित होते. तसेच रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे राष्ट्रीय प्रमुख व दक्षता अधिकारी बन्सी लाल भारद्वाज, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ पत्रकार व मा. विशेष कार्यकारी अधिकारी संजय कदम, तसेच कायदेशीर सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनोहर सचदेव यांनी मान्यवर वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मान्यवरांनी आपल्या अनुभवांच्या आधारे कायद्याच्या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी, व्यावसायिक जीवनातील शिस्त, नैतिक मूल्यांचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांची समाजाप्रती असलेली जबाबदारी यांविषयी मार्गदर्शन केले. केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता व्यावहारिक ज्ञान, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक आणि सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले.

या अभिमुखता कार्यक्रमामुळे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवन, शैक्षणिक कार्यपद्धती आणि कायद्याच्या क्षेत्रातील भविष्यातील संधी यांची उपयुक्त माहिती मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक प्रवासाबद्दल उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.