


रसायनी (आनंद पवार)
चांभालीऀ येथील दुर्गामाता कॉलनीमध्ये बंगाली कल्चरल अँड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने‘श्री श्री दुर्गापूजा संस्कृती २०२६’या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच उमाताई मुंढे यांच्या हस्ते देवीचे पूजन करण्यात आले. या उत्सवामुळे दुर्गामाता कॉलनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून,बंगाली बांधवांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.या कार्यक्रमाला रसायनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव,शिवसेना शिंदे गटाच्या खालापूर तालुका महिला आघाडी प्रमुख दीपिका भंडारकर,ग्रामपंचायत सदस्या स्वप्नाली महेंद्रीगीकर, पत्रकार आनंद पवार आणि वरद मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या उपस्थितीत देवीचे पूजन करून उत्सवाला सुरुवात करण्यात आली.

२०१८ पासून दुर्गापूजेची परंपरा कायम
बंगाली कल्चरल अँड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सन २०१८ पासून चांभारली येथील दुर्गामाता कॉलनीमध्ये दुर्गापूजा उत्सवाचे आयोजन केले जात आहे.दरवर्षी बंगाली बांधव मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने दुर्गादेवीची स्थापना करून आपल्या कुटुंबीयांसह हा उत्सव आनंदात साजरा करतात.या उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेचे जतन करण्याबरोबरच सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक वारसाही जपला जात आहे.बंगाली समाजातील दुर्गापूजा उत्सवाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात दुर्गादेवीच्या षष्ठीपासून विजयादशमीपर्यंत विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विजयादशमीच्या दिवशी महिलांकडून पारंपरिक सिंदूर खेळ साजरा केला जातो.त्यानंतर दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून उत्सवाची सांगता केली जाते.
कोलकात्याच्या कलाकारांकडून दुर्गादेवीची मूर्ती साकारली जाते
या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुर्गादेवीची आकर्षक मूर्ती.ही मूर्ती साकारण्यासाठी कोलकाता येथील कलाकारांचे कौशल्य लाभते.त्यांच्या कलाकुसरीतून देवीची सुंदर आणि देखणी मूर्ती तयार केली जाते.पनवेल परिसरात मूर्ती साकारल्यानंतर तिची चांभारली येथील दुर्गामाता कॉलनीत विधिवत प्रतिष्ठापना केली जाते.त्यामुळे या उत्सवाला बंगाली संस्कृतीची खास ओळख लाभते.
उत्सवाच्या यशस्वितेसाठी पदाधिकाऱ्यांचे विशेष परिश्रम ‘श्री श्री दुर्गापूजा संस्कृती २०२६’ हा उत्सव यशस्वी करण्यासाठी बंगाली कल्चरल अँड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष एस.के.जाना,सेक्रेटरी बैद्यनाथ दास,प्रतिभा पाईक,दीपिका दास,पूर्णिमा रॉय,मंजू शेखर,अंजू रॉय, प्रमिला रॉय,संगीता यादव,अलोकलता जाना,सुजयकर,राजू रॉय,नरेश यादव,शंकर रॉय, शांतू जाना आदी पदाधिकारी व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत. श्रद्धा,भक्ती आणि बंगाली संस्कृतीचा सुंदर संगम असलेल्या या दुर्गापूजा उत्सवामुळे चांभारली परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिकच उत्साही झाले आहे.



Be First to Comment