Press "Enter" to skip to content

मोहोपाडा नवीन पोसरीत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली; दोन महिन्यांपासून रस्त्यावर पाणी, ग्रामपंचायतीच्या कारभारावर रहिवाशांची नाराजी !

दुरुस्ती करूनही समस्या कायम; रस्त्यावर दलदल आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

रसायनी (आनंद पवार)

मोहोपाडा येथील नवीन पोसरी परिसरात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे.या समस्येमुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असून, ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे गांभीर्य कधी लक्षात येणार,असा सवाल उपस्थित केला जात आहे.नवीन पोसरी परिसरातील कोंडीराम पाटील यांच्या घरापासून ह.भ.प.काशिनाथ महाराज लबडे यांच्या घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटल्याने गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून रस्त्यावर सतत पाणी वाहत आहे. परिणामी,रस्त्यावर सर्वत्र चिखल आणि दलदल निर्माण झाली असून,येथून ये-जा करताना रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्लंबर येतात,दुरुस्ती करतात;मात्र समस्या पुन्हा जैसे थे!
या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी येथील रहिवासी गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायतीत चकरा मारत आहेत. पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन व्यवस्थित दुरुस्त करून मिळावी,यासाठी त्यांनी वेळोवेळी संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. मात्र,ग्रामपंचायतीचे प्लंबर येऊन दुरुस्ती करतात आणि काही दिवसांतच पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते.अशी व्यथा स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

वारंवार दुरुस्ती करूनही पाइपलाइन फुटण्याचे प्रकार थांबत नसल्याने तात्पुरत्या उपाययोजना ऐवजी संबंधित पाइपलाइन नव्याने टाकण्यात यावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.वारंवार दुरुस्तीवर वेळ आणि श्रम खर्च करण्यापेक्षा पाइपलाइनची कायमस्वरूपी सुधारणा केल्यास हा प्रश्न कायमचा सुटू शकतो,अशी भूमिका येथील रहिवाशांनी मांडली आहे.

रस्त्यावर दलदल, डासांचा प्रादुर्भाव; आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती
पाइपलाइनमधून सतत पाणी वाहत असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून,त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनू शकतो, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे.एकीकडे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असताना दुसरीकडे नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे या समस्येकडे केवळ किरकोळ दुरुस्तीचा प्रश्न म्हणून न पाहता, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि आरोग्याशी संबंधित मूलभूत समस्या म्हणून पाहणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे!
नवीन पोसरी परिसरातील रहिवाशांना गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून या समस्येचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येची प्रत्यक्ष पाहणी करून फुटलेल्या पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती करावी किंवा आवश्यकतेनुसार ती नव्याने टाकण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.पिण्याचे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. मात्र,पाइपलाइन फुटल्याने पाण्याचा अपव्यय होणे आणि त्याच वेळी नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागणे, ही बाब चिंताजनक आहे.त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नवीन पोसरीतील रहिवाशांना दिलासा द्यावा,अशी अपेक्षा नागरिकांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.