


प्रतिस्पर्ध्यावर १०-० अशी मात करत क्षितिजा मरागजे हिने पटकावले चौथ्यांदा सुवर्णपदक, प्रणाली घनवटची रौप्य, तर ऋतुजा रुपनवरची कांस्यपदकावर मोहोर
खोपोली : प्रतिस्पर्ध्याला एकही गुण मिळू न देता १०-० असा धुव्वा उडवायचा आणि सुवर्णपदकावर चौथ्यांदा मोहर उमटवून कु. क्षितिजा पूजा जगदीश मरागजे हिने पंढरपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तिच्या या चौथ्या राज्यस्तरीय सुवर्णपदकाने कुस्तीच्या आखाड्यात तिच्या जिद्दीचा आणि कौशल्याचा पुन्हा एकदा डंका वाजवला आहे. याच स्पर्धेतील प्रणाली घनवट हिच्या रौप्यपदकाने आणि ऋतुजा रुपनवर हिच्या कांस्यपदकाने रायगडच्या कुस्तीविश्वाच्या यशात आणखी भर घातली आहे.
क्षितिजाची सुवर्णभरारी, चौथ्या सुवर्णपदकावर मोहोर!
खोपोली येथे वास्तव्यास असलेली क्षितिजा प. पू. गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबत कुस्तीच्या मैदानातही आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या क्षितिजाने प्रतिस्पर्धी मल्लावर १०-० अशी एकतर्फी मात करत सुवर्णपदक पटकावले. राज्यस्तरीय स्पर्धेतील तिचे हे चौथे सुवर्णपदक असून, सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने यशाचा चौकार पूर्ण केला आहे.
कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाची खेळाडू असलेल्या क्षितिजाला संकुलाचे अध्यक्ष तथा कुस्ती प्रशिक्षक राजाराम कुंभार, विजय चव्हाण आणि दिवेश पालांडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच राज्यस्तरीय कुस्ती प्रशिक्षक संदीप वांजळे यांच्या प्रशिक्षणामुळे तिच्या खेळाला अधिक धार मिळत आहे. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःमधील कौशल्य अधिक विकसित करण्याची धडपड यांचा सुंदर संगम क्षितिजाच्या कामगिरीतून दिसून येतो.

प्रणाली घनवटची रौप्यझेप!
राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रणाली घनवट हिने रौप्यपदक पटकावत आपल्या मेहनतीची आणि कुस्तीतील कौशल्याची छाप उमटवली. स्पर्धेतील तिच्या या यशामुळे रायगडच्या क्रीडा क्षेत्राला आणखी एक मानाचा क्षण मिळाला आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि स्पर्धात्मक वृत्तीच्या बळावर मिळवलेले हे रौप्यपदक तिच्या पुढील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
ऋतुजा रुपनवरची कांस्यपदकावर मोहोर!
याच स्पर्धेत ऋतुजा रुपनवर हिने कांस्यपदक पटकावत आपल्या क्रीडाकौशल्याची झलक दाखवली. राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळवण्याची कामगिरी तिच्या मेहनतीचे फलित आहे.
क्षितिजाच्या सुवर्णयशासोबत प्रणाली आणि ऋतुजा यांच्या पदकांमुळे खोपोलीच्या कुस्ती क्षेत्रातील खेळाडूंच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
क्षितिजा, प्रणाली आणि ऋतुजा यांच्या यशाबद्दल रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर, खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण, खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन हिरे, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाह किशोर पाटील आणि प. पू. गगनगिरी इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक गौरव तिवारी यांनी अभिनंदन केले आहे.



Be First to Comment