
रसायनी — राकेश खराडे
आंतरराष्ट्रीय तायक्वांदो पंच तुषार सिनलकर यांची जपान येथे होणाऱ्या पाचव्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ साठी आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (International Technical Official) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत जबाबदारी पार पाडण्यासाठी ते जपानमध्ये दाखल झाले असून, त्यांच्या या निवडीमुळे भारतीय तायक्वांदो क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
तुषार सिनलकर हे रायगड जिल्ह्यातील असून यापूर्वी विविध प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करत आपल्या कौशल्याचा आणि अनुभवाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आशियाई तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा २०२६, मंगोलिया (क्योरुगी, पुमसे आणि पॅरा), चुनचॉन ओपन जी-२, दक्षिण कोरिया, माऊंट एव्हरेस्ट ओपन जी-१, नेपाळ, ऑस्ट्रेलिया ओपन जी-२ आणि ओशिनिया प्रेसिडेंट कप जी-३, ऑस्ट्रेलिया या स्पर्धांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरासोबतच त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड २०२५, विविध राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, भारतीय संघाच्या निवड चाचण्या, पोलीस क्रीडा स्पर्धा आणि शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी पंच म्हणून काम केले आहे.
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा ही आशिया खंडातील दिव्यांग खेळाडूंसाठी आयोजित केली जाणारी एक महत्त्वाची बहुक्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती होणे, ही तुषार सिनलकर यांच्या क्रीडा कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे. या माध्यमातून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
या यशामागे जागतिक आणि आशियाई तायक्वांदो संघटना, भारतीय तायक्वांदो संघटना — इंडिया तायक्वांदो, पंच प्रमुख, प्रशिक्षक आणि विशेषतः आई-वडिलांचे मोलाचे योगदान असल्याचे तुषार सिनलकर यांनी सांगितले.
त्यांच्या या निवडीमुळे भारतीय तायक्वांदो क्षेत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपस्थिती अधोरेखित झाली आहे. तुषार सिनलकर यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ मधील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Be First to Comment