Press "Enter" to skip to content

आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व्यासपीठावर CSMU ची भरारी : मानसशास्त्राचे ९ विद्यार्थी आणि १ प्राध्यापक मलेशियात विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार

रसायनी — राकेश खराडे

शेडूंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ (CSMU) विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुभवाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यापीठाच्या Centre for International Relations (CIR) या विभागाच्या आंतरराष्ट्रीयीकरण उपक्रमांतर्गत विद्यापीठाचे १० सदस्यीय प्रतिनिधीमंडळ मलेशियातील INTI International University येथे आयोजित IN-SPIRE 2026 (International Studies in Psychology, Innovation, Research & Experience) या दोन आठवड्यांच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या प्रतिनिधीमंडळात मानसशास्त्र विषयाचे ९ विद्यार्थी आणि १ प्राध्यापक प्रतिनिधी यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम १४ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना मानसशास्त्र, संशोधन पद्धती, आंतरविद्याशाखीय अध्ययन, शैक्षणिक लेखन आणि सांस्कृतिक विविधता या क्षेत्रांतील जागतिक स्तरावरील अनुभव प्रदान करणे हा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्राध्यापकांशी संवाद साधण्याची, संशोधन प्रस्ताव विकसित करण्याची, बिब्लिओमेट्रिक विश्लेषण करण्याची आणि संशोधन लेखनाचे कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय संस्कृती आणि शैक्षणिक परंपरांची ओळख करून घेता येणार आहे.

या प्रतिनिधीमंडळाच्या प्राध्यापक समन्वयक म्हणून डॉ. पल्लवी डोंगरे, संचालक, Centre for International Relations, या नेतृत्व करणार आहेत. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे नियोजन, विद्यार्थ्यांचा सहभाग, परदेशी विद्यापीठाशी समन्वय आणि आवश्यक प्रशासकीय व्यवस्था यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ. पल्लवी डोंगरे आणि डॉ. भावेश पासी यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

विद्यापीठाचे चेअरमन यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक वातावरणाशी जोडणे, त्यांच्या संशोधन क्षमतांना चालना देणे आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या सहभागामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वातावरणात शिकण्याची, संशोधनविषयक कौशल्ये विकसित करण्याची आणि विविध देशांतील शैक्षणिक दृष्टिकोन समजून घेण्याची संधी मिळणार आहे. भविष्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

CSMU च्या या आंतरराष्ट्रीय उपक्रमामुळे विद्यापीठाच्या जागतिक शैक्षणिक सहकार्याला बळ मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, संशोधन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे नवे क्षितिज खुले होणार आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.