
पनवेल, दि. १५ (वार्ताहर) : जन्म-मृत्यू दाखल्यांच्या मान्यतेसाठी नागरिकांना अलिबाग येथे पाठविण्याची प्रक्रिया थांबवून पनवेल महानगरपालिकेतच मान्यता देण्याची व्यवस्था सुरू करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दाखल्यांसाठी होणारा विलंब कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पनवेल नगरपरिषदेच्या काळातील जुन्या जन्मदाखल्यांवर इंग्रजीत नाव नसल्याने नागरिकांना विविध कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच काही दाखल्यांच्या मान्यतेसाठी संबंधित प्रकरणे अलिबाग येथील रायगड जिल्हा जन्म-मृत्यू विभागाकडे पाठवावी लागतात. या प्रक्रियेमुळे बराच कालावधी जात असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
या समस्येची दखल घेत नगरसेविका आर्या जाधव यांनी पनवेल महापालिका आयुक्तांकडे निवेदन देऊन जन्म-मृत्यू दाखल्यांच्या मान्यतेची प्रक्रिया महापालिकेतच सुरू करण्याची मागणी केली होती. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र मान्यता विभाग सुरू करावा, अशीही त्यांची मागणी आहे.
महापालिकेतच मान्यता मिळाल्यास नागरिकांची अलिबागला जाण्याची गरज कमी होणार असून, वेळ आणि खर्चाची बचत होण्यास मदत होईल.


Be First to Comment