Press "Enter" to skip to content

दक्षिण रायगडचे जंगल खैरमाफियांच्या घशात; वनविभाग झोपेत की सामील ? : रक्षकच भक्षक बनल्याचा आरोप; दोषी वनपाल-वनरक्षकांना तात्काळ बडतर्फ करा, नंदू शिर्के यांची वनमंत्र्यांकडे मागणी


म्हसळा प्रतिनिधी : समीर बामुगडे

दक्षिण रायगडमधील म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड, माणगाव आणि महाड तालुक्यांतील हिरवीगार जंगले आज खैरमाफियांच्या कुऱ्हाडीखाली उघडपणे उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप होत आहे. मौल्यवान खैर वृक्षांची राजरोस कत्तल सुरू आहे, आणि ती रोखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तो वनविभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संताप स्थानिकांमधून व्यक्त होत आहे. वनसमितीचे अध्यक्ष नंदू शिर्के यांनी तर याहून गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, वनविभागातीलच काही कर्मचारी खैरमाफियांना अभय देत असून “रक्षकच भक्षक” बनले आहेत.

जंगलाचे संरक्षण, अवैध वृक्षतोडीला आळा आणि वनसंपत्तीच्या चोरीला लगाम घालणे हे वनविभागाचे मूलभूत कर्तव्य आहे. याच कामासाठी जनतेच्या पैशातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातात. तरीही जंगलातून खैराचे ओंडके ट्रक भरून बाहेर पडत असतील, तर वनविभागाची गस्त, तपासणी नाके आणि नियंत्रण यंत्रणा नेमकी करते तरी काय, असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. हे केवळ दुर्लक्ष आहे की संगनमत, याचे उत्तर वनविभागाला द्यावेच लागेल.

म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांतील खैर वृक्षसंपदा अक्षरशः संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड परिसरातही खैरतोड करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे आरोप आहेत. इतकेच नव्हे, तर पंचनामे करतानाही अनियमितता करून प्रकरणे दडपली जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. पंचनाम्यांमध्येच गडबड होत असेल, तर गुन्हेगारांना शिक्षा होणार तरी कशी?

माफियांची मुजोरी इतकी वाढली आहे की, जंगल वाचवण्यासाठी पुढे येणाऱ्यांवरच हल्ले होत असल्याचे आरोप आहेत. गणेशोत्सवापूर्वी ताम्हिणी परिसरातील शिर्के गावाच्या हद्दीत वनसमितीचे अध्यक्ष नंदू शिर्के यांच्यावर खैरमाफियांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. जंगल वाचवणाऱ्यांवरच हल्ले होत असतील आणि यंत्रणा गप्प बसत असेल, तर हा कायद्याच्या राज्याला दिलेला खुला आव्हानच म्हणावा लागेल. हल्लेखोरांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

दरम्यान, रोहा वनविभागाचे उपवनसंरक्षक आशुतोष शेडगे यांनी खैरतस्करी प्रकरणात काते टोळीविरोधात कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अरविंद सखाराम काते यांचे नाव समोर आले आहे. मात्र, एखाद्या टोळीवर कारवाई करून वनविभाग आपली जबाबदारी झटकू शकत नाही. या टोळ्यांना पाठबळ देणारे विभागातील हात कोणाचे, हे शोधणे जास्त महत्त्वाचे आहे. कारवाईचा संपूर्ण अधिकृत तपशील वनविभागाने तात्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.

खैरतोडीला मदत करणाऱ्या वनपाल आणि वनरक्षकांची तात्काळ विभागीय चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांना कोणतीही दयामाया न दाखवता सेवेतून बडतर्फ करावे, अशी ठाम मागणी नंदू शिर्के यांनी वनमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे. आता वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि वनमंत्री या गंभीर आरोपांची दखल घेऊन ठोस कारवाई करतात की नेहमीप्रमाणे फाईल धूळ खात पडते, याकडे संपूर्ण दक्षिण रायगडचे लक्ष लागले आहे. आज कारवाई झाली नाही, तर उद्या रायगडच्या जंगलात खैराचे झाड केवळ फोटोतच पाहायला मिळेल, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.