
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबद्दल अभिनंदन; आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा
पनवेल (प्रतिनिधी) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विंडसर्फिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी युवा खेळाडू प्रियांशी मयूर पाटील हिने महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे नगरसेवक परेश ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी परेश ठाकूर यांनी प्रियांशीच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धेसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा देत, भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचा नावलौकिक वाढवावा, अशी सदिच्छा व्यक्त केली.
प्रियांशी पाटील ही विंडसर्फिंगच्या टेक्नो २९३ प्रकारात १७ वर्षांखालील मुलींच्या गटात सहभागी होत असून, तिने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सिंगापूर, थायलंड, तुर्की, पोलंड आणि मलेशिया यांसह विविध देशांमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये तिने सहभाग नोंदवला आहे. तसेच युवा ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही तिची निवड व पात्रता झाली असून शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात सातत्याने मेहनत घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रियांशीच्या जिद्दीचे आणि कर्तृत्वाचे कौतुक करत, तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी सर्वतोपरी शुभेच्छा यावेळी परेश ठाकूर यांनी दिल्या.


Be First to Comment