Press "Enter" to skip to content

खांदेश्वरमध्ये ‘खांदेश्वरी माऊली’ नवरात्रोत्सवाची धूमआमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पोस्टरचे प्रकाशन; रास-दांडिया ठरणार प्रमुख आकर्षण, विविध स्पर्धांचीही मेजवानी

पनवेल (प्रतिनिधी) खांदेश्वर परिसरातील नागरिकांसाठी यंदाचा नवरात्रोत्सव भक्ती, संस्कृती आणि मनोरंजनाचा अनोखा संगम ठरणार आहे. जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ मोठा खांदा आणि पारनेरकर रहिवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने ‘खांदेश्वरी माऊली सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ११ ऑक्टोबर ते मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर, अक्षर सोसायटीजवळ, प्लॉट क्रमांक २७, सेक्टर २५ येथे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पोस्टरचे प्रकाशन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
     

या वेळी भाजप ओबीसी मोर्चाचे पनवेल शहराध्यक्ष तथा मुख्य आयोजक सतीश दत्ता पाटील, पारनेरकर रहिवासी संघाचे अध्यक्ष भाऊ पावडे, सचिव कृष्णा ढोमे, माजी नगरसेविका सारिका भगत, नगरसेवक सुमित झुंजारराव, भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजपचे स्थानिक नेते मोतीलाल कोळी, माजी नगरसेवक महेंद्र कावळे, अक्षय मगर, शुभम वाफारे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उत्सव आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.पहिल्याच वर्षी भव्य स्वरूपात आयोजन!

‘खांदेश्वरी माऊली’ सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे यंदा पहिलेच वर्ष आहे. मात्र पहिल्याच वर्षी उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे खांदेश्वर, कामोठे, पनवेल आणि परिसरातील नागरिकांसाठी हा उत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांनी एकत्र यावे, विविध कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि नव्या पिढीला भारतीय संस्कृती व परंपरेशी जोडता यावे, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रास-दांडियाची विशेष रंगत!

उत्सवातील भव्य रास-दांडिया स्पर्धा हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. पनवेल परिसरामध्ये सर्वाधिक बक्षिसांची लयलूट करणारी रास-दांडिया स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महिला, युवक आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.
रास-दांडियासाठी विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या सहभागी आणि संघांना गौरविण्यात येणार असल्याने या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी स्पर्धा

नवरात्रोत्सवात केवळ रास-दांडियाच नव्हे, तर विविध वयोगटातील नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि रील स्पर्धेचा समावेश आहे. बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी फॅन्सी ड्रेस आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. तरुणाईच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे यासाठी रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय थेट खाद्य व वस्तूंचे स्टॉलही उत्सवाच्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे कुटुंबासह उत्सवाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांना विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.धार्मिकतेला सांस्कृतिक अधिष्ठान!

घटस्थापनेपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. नऊ दिवस देवीची आराधना, पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात. मात्र काळानुसार या उत्सवाला सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपही प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर खांदेश्वरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवात अध्यात्मिक आणि धार्मिक वातावरणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांनी एकत्र येऊन उत्सवाचा आनंद घ्यावा आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ व्हावा, हा या आयोजनामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.