Press "Enter" to skip to content

करंजाडे येथे अडीच दिवसांचा गौरा-गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा ; आरोग्य शिबिरात ३०० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

पनवेल/प्रतिनिधी — करंजाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीने आयोजित अडीच दिवसांचा गौरा-गणपती उत्सव यंदा अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात संपन्न झाला. “करंजाडेचा विघ्नहर्ता” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाप्पाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. मंडळाचे अध्यक्ष माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेटके आयोजन करण्यात आले होते.

उत्सवादरम्यान सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यासोबतच महिलांच्या कलागुणांना आणि उत्साहाला वाव देण्यासाठी विशेष मंगळागौर स्पर्धा आणि खेळ पैठणीचा यांसारख्या पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये करंजाडे परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग घेतला. तसेच, चिमुकल्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करून त्यांच्या सुप्त गुणांना मंच उपलब्ध करून देण्यात आला.

उत्सवाच्या सांगता प्रसंगी भक्तीमय वातावरणात सुश्राव्य भजन आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव अमित यादव, उपसचिव चेतन आंग्रे, खजिनदार योगेश फापाळे, उपखजिनदार निखिल डांगे, कार्याध्यक्ष उमेश भोईर तसेच महिला मंडळाच्या चैताली माळी, चेतना भोईर, पूजा भोईर, शर्वरी पोईपकर, श्रुती दिवेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला माजी नगराध्याध्यक्ष जे. एन. म्हात्रे, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका ममता म्हात्रे, गुरुनाथ फडके, गजानन पाटील यांसह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.