Press "Enter" to skip to content

नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; २६ कोटी ३० लाखांचे ७२६ किलो अमली पदार्थ नष्ट


पनवेल, दि.१ (वार्ताहर) : ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानांतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईला आणखी वेग दिला आहे. विविध २०१ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले एकूण ७२६ किलो वजनाचे आणि तब्बल २६ कोटी ३० लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून नष्ट करण्यात आले.

यावेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त दीपक साकोरें, अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे, पोलीस उपायुक्त अमित काळे, सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, भाऊसाहेब ढोले, संदीप निंगडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानांतर्गत ‘कॅम्पस कनेक्ट’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, सोसायट्या तसेच सार्वजनिक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती दिली जात आहे.

अमली पदार्थांबाबत माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांक सुरू केला असून नागरिकांना आपली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमली पदार्थांविरोधातील कारवाई भविष्यातही अधिक तीव्र, कायदेशीर आणि समन्वयाने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.