Press "Enter" to skip to content

अल्काईल अमाईन्सच्या सामाजिक बांधिलकीला बळ !

वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीला अत्याधुनिक घंटागाडी ; ४१ महिलांचे व्यावसायिक शिवण प्रशिक्षण पूर्ण

रसायनी (आनंद पवार) अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड,पाताळगंगा कंपनीने आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेला हातभार लावत अत्याधुनिक घंटागाडी प्रदान केली. त्याचबरोबर कंपनीच्या सीएसआर निधीतून ४१ महिलांना १२० दिवसांचे व्यावसायिक शिवणकामाचे प्रशिक्षण देऊन महिला सक्षमीकरणालाही चालना दिली आहे. त्यामुळे कंपनीच्या सामाजिक बांधिलकीचे परिसरातून कौतुक होत आहे.

स्वच्छ गाव,सुंदर गावासाठी घंटागाडीची मदत वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कचरा व्यवस्थापनाच्या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून अल्काईल अमाईन्सने वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीला घंटागाडी उपलब्ध करून दिली. कंपनीच्या सिनियर मॅनेजर (एचआर) ग्रीष्मा पटेल यांच्या हस्ते विधिवत पूजा करून सरपंच उमा मुंढे यांच्याकडे घंटागाडीची चावी सुपूर्द करण्यात आली.यावेळी ग्रीष्मा पटेल यांनी सांगितले की,‘स्वच्छ गाव,सुंदर गाव’ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य संकलन व व्यवस्थापन व्हावे,या उद्देशाने कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून ही मदत केली आहे.

सरपंच उमाताई मुंढे यांनी अल्काईल अमाईन्स कंपनीचे आभार मानत कंपनीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे सांगितले.या घंटागाडीमुळे गावातील कचरा संकलन अधिक सुरळीत होऊन स्वच्छता व्यवस्थेला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कंपनीच्या सीएसआर अधिकारी निकिता म्हात्रे, सीएसआर सल्लागार रवी ओंकार,प्लांट एच.आर.श्रीमती. अर्चना माने ग्रामपंचायत सदस्य रसिका पाटील,संगीता भोईर,स्वप्नाली म्हात्रे, कविता पाटील,माया पाटील,केदार भोईर, ग्रामसेवक,बचत गट अध्यक्षा वर्षा पाटील तसेच पत्रकार उपस्थित होते.

४१ महिलांच्या हाताला कौशल्य; आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग
दरम्यान,अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड,पाताळगंगा यांच्या सीएसआर निधीतून आणि महिला विकास व शिशु संस्कार केंद्र, सानपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने वासांबे-मोहोपाडा येथील ४१ महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या १२० दिवसांच्या व्यावसायिक शिवण प्रशिक्षणाचा समारोप प्रमाणपत्र वितरणाने झाला.या प्रशिक्षणामध्ये महिलांना अत्याधुनिक शिवण मशीनवर प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.त्यासोबतच तीन दिवसांचे विशेष डिजिटल व आर्थिक साक्षरता प्रशिक्षण देण्यात आले.यामध्ये व्हॉट्सॲप बिझनेस, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल कॅटलॉग तयार करणे,ग्राहक व्यवस्थापन,ई-टेंडर तसेच बचत व नफा व्यवस्थापन याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. समारोप कार्यक्रमात कंपनीच्या सिनियर एचआर मॅनेजर ग्रीष्मा पटेल,सीएसआर अधिकारी निकिता म्हात्रे,सल्लागार रवी ओंकार,सरपंच उमा मुंढे,ग्रामपंचायत सदस्य रसिका पाटील,संगीता भोईर, स्वप्नाली म्हात्रे, कविता पाटील,माया पाटील,केदार भोईर, बचत गट अध्यक्षा वर्षा पाटील,शारदा काळे, धनंजय जोशी तसेच प्रशिक्षक सुरेश वाडकर उपस्थित होते.

महिलांनी प्रशिक्षणादरम्यान तयार केलेल्या कपड्यांचे ग्रीष्मा पटेल यांनी कौतुक केले.प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभा करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर व्हावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.सरपंच उमाताई मुंढे यांनी अल्काईल अमाईन्सच्या महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमाचे कौतुक केले.तसेच ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन प्रशिक्षण मोहिमेसाठी शुभेच्छा देत, कंपनीकडून मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून महिलांनी केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता यशस्वी उद्योजिका बनण्याचे आवाहन केले.स्वच्छता व्यवस्थेला साधनांची साथ आणि महिलांच्या हाताला कौशल्याची जोड देत अल्काईल अमाईन्सने सीएसआर उपक्रमातून सामाजिक विकासाचा दुहेरी आदर्श निर्माण केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.