
पेण, ता. 29 (वार्ताहर) : पेण तालुक्यात गेली अनेक वर्ष सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रासह आंबेडकरी चळवळीत काम करत असणारे सामाजिक कार्यकर्ते नागेश सुर्वे यांना डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते रायगड समाज रत्न सन्मान पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा अंतर्गत पेण शाखा व वंचित बहुजन आघाडी पेण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास कार्यक्रमासह रायगड समाजरत्न सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पेण येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ.भीमराव आंबेडकर, संस्कार उपाध्यक्ष विजय कांबळे, केंद्रीय सदस्या सुनंदा वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सोनवणे, महासभेचे पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, वंचितचे तालुका अध्यक्ष सुनील धामणकर, महिला जिल्हाध्यक्षा उषा कांबळे आदिंसह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.भीमराव आंबेडकर म्हणाले की वर्षावास मालिकेच्या निमित्ताने संस्थेचे कार्य देशभर सुरू असून या माध्यमातून आपण बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचविणे गरजेचे आहे आत्ताचे युग हे तंत्रज्ञानाचे असले तरी आपली संस्कृती आपण टिकवून ठेवली पाहिजे पेण मध्ये संस्थेचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. तर या कार्यक्रमानिमित्त संस्थेने मागील अनेक वर्ष सामाजिक कार्य करणारे नागेश सुर्वे यांना रायगड समाज रत्न सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


Be First to Comment