Press "Enter" to skip to content

अमली पदार्थांची तस्करी की सिव्हिल वॉरचा शंखनाद?

    तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तब्बल 3 हजार कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या एका इराणी बोटीतून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक केली. हे पाच आरोपी समुद्राच्या मार्गाने 526 किलो मेथाम्फेटामाइन आणि हेरॉइन मुंबईला घेऊन जात होते. सुरक्षा दलांनी 25 सप्टेंबर रोजी लक्षद्वीपजवळ ही कारवाई केली. यापूर्वी, एप्रिल 2025 मध्ये, दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या किनाऱ्याजवळून अंदाजे 311 किलो मेथाम्फेटामाइन जप्त केले होते, ज्याची किंमत 1,800 कोटी रुपये होती. हा माल पाकिस्तानातील पसनी बंदरातून तामिळनाडूला जात होता. सुरक्षा दलांना पाहताच तस्करांनी अंमली पदार्थ समुद्रात फेकून दिले आणि पाकिस्तानी सागरी सीमेच्या दिशेने पलायन केले.
       
    एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितले की, "10 सप्टेंबर रोजी गुजरात एटीएसचे पोलीस निरीक्षक जे.एम. पटेल यांना अशी माहिती मिळाली की, गुजरातमध्ये बऱ्याच काळापासून वॉन्टेड असलेल्या एका आरोपीने नायजेरियन नागरिकाशी संपर्क साधला होता; त्या नायजेरियन व्यक्तीच्या सांगण्यावरून, त्याने गुजरातमध्ये एका व्यक्तीची भेट घेतली होती. या भेटीनंतर, 'आझाद' नावाच्या इराणी बोटीद्वारे 500 किलोहून अधिक अमली पदार्थांचा साठा भारतात आणण्याची योजना आखण्यात आली होती. त्यांनी काही आगाऊ रक्कमही हस्तांतरित केली होती.

मोहीम सुमारे 17 दिवस सुरू होती
मिळालेल्या पक्क्या गुप्त माहितीनुसार, पाच आरोपी इराणी किनारपट्टीवरील कोनारक बंदराच्या परिसरातून निघाले होते आणि पाकिस्तानमधील ग्वादर किनारपट्टीजवळ एका लहान बोटीने ‘आझाद’ बोटीपर्यंत येऊन अमली पदार्थांचा साठा त्यांच्याकडे सोपवला होता. या माहितीच्या आधारे, गुजरात एटीएसने कोस्ट गार्ड मुख्यालयाच्या ऑपरेशन्स विभागाशी समन्वय साधला. एक संयुक्त पथक तयार करण्यात आले; तांत्रिक कारणांमुळे हे पथक कोची येथून रवाना करण्यात आले. या विस्तीर्ण क्षेत्रात चाललेली ही मोहीम सुमारे 17 दिवस सुरू होती. 25 सप्टेंबर रोजी, त्यांना लक्षद्वीपच्या वायव्येस सुमारे 160 नॉटिकल मैल आणि मुंबईच्या नैऋत्येस 490 नॉटिकल मैल अंतरावर ‘आझाद’ ही संशयास्पद बोट आढळून आली. त्यांनी यशस्वीरीत्या ती बोट अडवली आणि तिची झडती घेतली. झडती मोहिमेनंतर, संबंधित व्यक्ती त्या बोटीसह आज पहाटे मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचल्या. 
प्राथमिक चौकशीतून पाचही आरोपींची ओळख पटली आहे. मोहम्मद याकूब बलुची, शाकिरुल्ला, फरीदुल्ला, अहमद खान आणि वाहिदुल्ला खान अशी त्यांची नावे असून हे सर्वजण पाकिस्तानचे रहिवासी आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी कोनारक बंदरावरून आपला सागरी प्रवास सुरू केला होता. काही काळ प्रवास केल्यानंतर, ग्वादर बंदरावरील मासेमारी करणाऱ्या एका लहान बोटीने त्यांच्या ‘आझाद’ बोटीजवळ येऊन अमली पदार्थांचा साठा त्यांच्या बोटीवर चढवला. त्यानंतर त्यांना हा साठा तामिळनाडूतील एका बोटीपर्यंत पोहोचवण्याचे काम देण्यात आले होते.
आज कारवाई करणाऱ्या तटरक्षक दल आणि गुजरातच्या एटीएस दलाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत असली तरी आपण आणि आपली पुढची पिढी किती भयानक मायाजालामध्ये वावरते आहे याचे भान आपल्याला येणे आवश्यक आहे. कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ हे आपल्या तरुण पिढीच्या हातात सहज दिले जात आहेत. गोरिला वॉर पद्धतीपेक्षा देखील अत्यंत खतरनाक अशी ही सायलेंट सिविल वॉर पद्धती देशाच्या भवितव्याला उखडून टाकण्यासाठी शस्त्रे पाजळत आहे.
अमली पदार्थांच्या व्यसनाचे अधीन झालेले तरुण एक वेळच्या व्यसनासाठी काहीही करण्यास तयार होतात. स्वतःला क्रांतिकारी म्हणणाऱ्या काही रिकाम टेकड्या लोकांनी ज्या पद्धतीने आंदोलनाच्या माध्यमातून सध्या ब्लॅकमेलिंग सुरू केलं आहे, अशा लोकांच्या आंदोलनात अमली पदार्थांच्या आहारी गेलेली तरुण पिढी सर्रास पाहायला मिळते. अमली पदार्थांच्या सेवनासाठी लागणाऱ्या पट्ट्या सर्रासपणे पानपट्ट्यांवरती उपलब्ध आहेत. पनवेल ते सीएसटी प्रवासादरम्यान खिडकीतून बाहेर डोकावलं तर दिवसाढवळ्या अमली पदार्थांची नशा करणारे नशेडी जागोजागी पाहायला मिळतात.
पाकिस्तान आणि चीन सारखी शत्रू राष्ट्रे भारताविरोधात सातत्याने विविध युद्ध पद्धती अवलंब करीत आलेले आहेत. एखाद्या प्रगतिशील देशाची तरुण पिढी नासविल्याने त्या देशाचा प्रगतीचा आलेख वेगाने खाली येतो. नेमकी हीच दुखती नस पकडून आपल्या तरुण पिढीच्या हातामध्ये अमली पदार्थ सोपविले जात आहेत. प्रत्येक गोष्ट पोलीस, प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्यावरती सोपवून आता आपल्याला नामा निराळे राहता येणार नाही. अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी पोलिसांनी टोल फ्री क्रमांक जागोजागी उपलब्ध करून ठेवलेले आहेत. एक जागरूक नागरिक म्हणून कानावर कुण कुण जरी आली तरी या टोल फ्री क्रमांक वरती तक्रारी करण्याची सवय आपल्याला लावून घ्यावी लागेल. अमली पदार्थांचे सेवन करणारा अल्पवयीन विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी केवळ आपल्या ओळखीची नाही म्हणून आपल्याला काय करायचे आहे? या विचाराला तिलांजली द्यावी लागेल.
चीन आणि पाकिस्तान अशा कांगावेखोर शत्रूंना आपले राज्यकर्ते का बरे थांबवत नाहीत? असले फुटकळ प्रश्न ड्रॉइंग रूम मध्ये बसून विचारण्यापेक्षा आमली पदार्थांच्या सप्लाय नेटवर्क ला थांबवण्यासाठी मी काय केले? हा प्रश्न आता स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.